‘कहो ना प्यार है…’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अमिषा पटेल चित्रपटसृष्टीत सध्या फारशी काम करताना दिसत नाही. ह्रतिकसोबतच्या यशानंतर तिच्या ‘गदर’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. अमिषा पटेल हिच्या कारकिर्दीतील हा सलग दुसरा यशस्वी चित्रपट ठरला होता. या दोन चित्रपटानंतर अमिषा पटेलच्या कारकिर्दीतील एकही चित्रपट इतका यशस्वी ठरला नाही. मात्र सुरुवातीच्या काळातील या दोन्ही चित्रपटानंतर सध्या आमिषाला बॉलिवूडमध्ये फारसा भाव मिळत नसल्याचे दिसते. मोजके चित्रपट वगळता तिला बॉलिवूडमध्ये छाप पाडण्यात अपयश आले असेच म्हणावे लागेल. बॉलिवूडमधील ही अपयशी अभिनेत्री आपल्या आनंदासाठी आता नवे प्रयोग करताना दिसत आहे. अमिषा मोकळ्या वेळेत अनेकदा पार्टीचा आनंद घेताना दिसते. विशेष म्हणजे पार्टीला किेंवा बॉलिवूड कलाकारांच्यासोबत असताना ती सेल्फी काढण्यात सर्वाधिक वेळ खर्च करते.

काही दिवसांपूर्वी अमिषा पटेल ‘रंगून’च्या खास स्क्रिनिंग शोमध्ये दिसली होती. यावेळी तिने चित्रपटावर लक्ष देण्यापेक्षा सेल्फीमध्ये रंगल्याचे दिसून आले होते. बॉलिवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. यामाध्यमातूनच तिने शाहिद कपूर आणि कंगनासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. तिच्या सोशल मीडियावर अकाउन्टवर नजर टाकल्यास अमिषा बॉलिवूडमधील कलाकारांसोबत फोटो काढण्याची एकही संधी चूकवत नसल्याचे सहज दिसून येते. काही दिवसांपूर्वीच तिने ह्रतिक रोशन आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ यांच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. अमिषाच्या गाजलेल्या चित्रपटाविषयी बोलायचे तर, गदर’ चित्रपटाच्या कथानकामध्ये धर्माबाहेर जाऊन झालेले प्रेम आणि त्यानंतर उद्भभवलेला संघर्ष दाखविण्यात आला होता.