हिंदी चित्रपटसृष्टी ही एक अशी दुनिया आहे जिथे येण्यासाठी बरेचजण विविध स्वप्न पाहात असतात. स्वप्ननगरी मुंबईमध्ये सुरुवात होणाऱ्या या स्वप्नांना मग भरारी मिळते आणि मग प्रवास सुरु होतो तो म्हणजे कलात्मक गोष्टींच्या निरिक्षणाचा आणि कलासक्त लोकांच्या अनुभवांचा. बॉलिवूडबद्दल असंच काहीसं कुतूहल असणाऱ्या मार्क बेनिंगटन या छायाचित्रकाराने त्याच्या नजरेतून एका अनोख्या आणि कधीही न पाहिलेल्या चित्रपटसृष्टीचं दर्शन घडवलं आहे. ‘लिव्हिंग द ड्रीम: लाइफ ऑफ द ‘बॉलिवूड’ अॅक्टर’ या पुस्तकामध्ये बॉलिवूडची ही वेगळी झलक पाहायला मिळतेय.

तब्बल ११२ छायाचित्रे असलेल्या या पुस्तकामध्ये कलाकारांसोबतच चित्रपटसृष्टीशी संलग्न इतरही काही व्यक्तींचे चेहरे यात पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे वरवर ‘फिल्मी’ म्हणवणाऱ्या या इंडस्ट्रीचं हे वेगळं रुपच आहे असे म्हणायला हरकत नाही. या पुस्तकाविषयी एका संकेतस्थळाशी बोलताना मार्क म्हणाला, ‘या पुस्तकात केवळ कलाकारांचेच फोटो घेतलेले नाहीत. तर, चित्रपटसृष्टीशी निगडीत हरएक व्यक्तीचा समावेश आहे. या पुस्तकामध्ये अभिनय जगताशी संलग्न सर्वांचीच झलक दाखवण्यात आली आहे.’

२०१० मध्ये मुंबईत आलेल्या मार्कच्या मनात हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल फारच कुतूहल होते. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील काही व्यक्तींची भेट घेत त्याला या वेगळ्या जगताला आणखीन जवळून जाणण्याची संधी मिळाली. पहिल्या भारतभेटीत मार्क दोन आठवडे मुंबईत राहिला होता. स्वत: अभिनेता राहिलेल्या मार्कला या क्षेत्रात काम करणाऱ्यांबद्दल बरीच माहीती होती. त्यामुळे इतरांचे या क्षेत्रात काम करतानाचे अनुभव आणि कलाकारांची खरी बाजू त्याने त्याच्या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकाविषयी बोलताना मार्क म्हणाला ‘मी जेव्हा एक फोटो जर्नलिस्ट म्हणून येथे आलो त्यावेळी अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्यांचा अनुभव कसा असतो? हे मला जाणून घेता आले. मला यावेळी सर्वांच्याच दृष्टीकोनातून चित्रपटसृष्टीकडे पाहायचे होते. त्यासाठी प्रसिद्ध कलाकार, स्ट्रगलर्स अशा कोणत्याही मर्यादा मी ठेवल्या नव्हत्या.’

mark1-750x500
mark2-750x500

एका वेगळ्या दृष्टीकोनातून मार्कने टिपलेल्या या छायाचित्रांमध्ये कलाकारांचे वेगळेच रुप पाहायला मिळतेय. मार्कच्या कॅमेऱ्याने दीपिका पदुकोणपासून ते अगदी रणबीर कपूर आणि नसिरुद्दीन शाहा या कलाकारांचे कॅण्डीड क्षण टिपले आहेत. कॅमेऱ्यासमोर असलेल्या कलाकारांची आणि त्यांच्यासाठी म्हणून काम करणाऱ्या संपूर्ण चमूची मेहनत, स्पॉटबॉय आणि पोस्टर रंगवणाऱ्या कलाकारांची कला या साऱ्याची झलक मार्कने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.

mark3-750x500

mark4-750x499

mark5-750x500

mark6-750x500

mark7-750x500