बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्टच्या नावाने ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान नेहमीच त्याच्या भूमिकांनी रसिकांच्या पसंतीस उतरतो. नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकांना न्याय देणाऱ्या आमिर खानचे चित्रपटही वेगळ्या विषयांवर भाष्य करणारे ठरतात. ‘कयामत से कयामत तक’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल’, ‘गुलाम’, ‘हम है राही प्यार के’, ‘सरफरोश’ या चित्रपटांतून त्याच्या अभिनयाची छाप उमटवत आमिरने अनेकांची दाद मिळवली होती.

पण, १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटामध्ये आमिरने सुरेख अभिनय सादर करुनही त्याला या चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर’चा पुरस्कार मिळाला नव्हता. हा पुरस्कार न मिळाल्यामुळे खुद्द आमिरही फार दु:खी होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिरला अभिनेता कमल हसनमुळे हा पुरस्कार मिळाला नव्हता.

आज तब्बल २४ वर्षांनंतर आमिर खानचा चुलत भाऊ मन्सूर खान यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. मुंबईत सुरु असणाऱ्या ‘मामि’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये नुकतीच मन्सूर खान आणि ‘ऐ दिल है मुश्किल’च्या स्टारकास्टने हजेरी लावली होती. त्यावेळी पार पडलेल्या एका चर्चासत्रामध्ये ते सहभागी झाले होते. या चित्रपटाला मन्सूरने दिग्दर्शित केले होते आणि आमिरचे काका नासिर हुसैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. ‘आमिरच्या ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटाच्या वेळी अनिल कपूरचा ‘बेटा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनिल कपूरला मिळाला, ज्यामुळे आमिर निराश झाला होता. आपल्याला न्याय मिळाला नाही, अशीच काहीशी त्याची भावना होती’, असे मन्सूरने स्पष्ट केले.

मन्सूर यांच्या म्हणण्यानुसार ‘त्या वेळी पुरस्कारांच्या ज्युरी सदस्यांमध्ये अभिनेता कमल हसन यांचाही समावेश होता. ज्यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक आणि अभिनेता या पुरस्कारांसाठी अनिल कपूरच्या नावाला प्राधान्य दिले होते’, असेही मन्सूर म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वी आलेल्या आमिरच्या या चित्रपटासंबंधीची चर्चा सध्या रंगत आहे.

तुर्तास, आमिर खान त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या ट्रेलरमुळेही चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये तो कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारत आहे. २३ डिसेंबरला या चित्रपटाद्वारे आमिरच्या रुपाने एक महत्त्वाकांक्षी कुस्तीपटू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.