अमित मसुरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘न्यूटन’ हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून ‘न्यूटन’ची निवड करण्यात आली आहे. राजकुमार राव या अभिनेत्याने ‘न्यूटन’मध्ये काम केले असून शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार कारगिलमध्ये शहीद झालेल्या ‘या’ लष्करी अधिकाऱ्याची भूमिका?

‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या निवड समितीने आज (शुक्रवारी) ऑस्करसाठी ‘न्यूटन’ची अधिकृत निवड झाल्याचे जाहीर केले. समितीने २६ चित्रपटांतून एकमताने ‘न्यूटन’च्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे सी व्ही रेड्डी यांनी सांगितले.

अमित मसुरकरने ‘न्यूटन’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी असून, यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. आपल्या भूमिकेविषयी एका मुलाखतीत राजकुमार म्हणालेला की, ‘या चित्रपटात मी एका सामान्य नागरिकाचे प्रतिनिधित्व केले आहे. घनदाट जंगलामधील नक्षलवाद्यांची संघर्ष कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. माझी भूमिका ही एका सामान्य नागरिकाची कहाणी सांगणारी आहे.’

वाचा : ‘मुगल-ए-आझम’ ते ‘पद्मावती’

शुक्रवारी ‘भूमी’, ‘न्यूटन’ आणि ‘हसिना पारकर : द क्वीन ऑफ मुंबई’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. प्रदर्शनाच्या दिवशीच न्यूटनची निवड झाल्याने राजकुमार रावने आनंद व्यक्त केला आहे. राजकुमार रावच्या ‘न्यूटन’ प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरला होता. समीक्षकांनीही या चित्रपटाची भरभरून प्रशंसा केली आहे.