अभिनेता आमिर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचा पहिला लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या लोगोचा फोटो ट्विट केला आहे. मुख्य म्हणजे या बहुचर्चित चित्रपटाचा हा लोगो ट्रेंडमध्येही आला आहे.

तरण आदर्शच्या ट्विटमधील लोगो पाहता राखाडी रंगाच्या या लोगोवर चित्रपटाचं नाव लिहिण्यात आलं असून एखाद्या दगडावर कोरीवकाम केल्याप्रमाणे हा लोगो दिसत आहे. या चित्रपटात साकारला जाणारा काळ आणि कथानक पाहता त्या दृष्टीने हा लोगो लक्षवेधी ठरत आहे. आदित्य चोप्राच्या ‘यशराज फिल्म्स’ या बॅनरअंतर्गत साकारणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शनापूर्वीच इतका चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या चित्रपटाची स्टारकास्ट. परफेक्शनिस्ट आमिर खान, बिग बी अमिताभ बच्चन हे दोन तगडे कलाकार या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरत आहेतच. पण, त्यासोबतच ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेख आणि कतरिना कैफसुद्धा ‘ठग्स…’मधून झळकणार आहेत. २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या फातिमा सना शेख चित्रपटाबद्दल फारच उत्सुक आहे.

वाचा: शंभरी पार केलेल्या फॅनची बिग बींनी घेतली भेट

‘येत्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार असून, परदेशात बहुतांश चित्रीकरण करण्यात येणार आहे. ‘ठग्स….’चं कथानक पाहता या चित्रीकरणासाठी भव्य सेट्स उभारण्यात आले असून सध्या त्याबद्दल बरीच गोपनीयता बाळगण्यात येत आहे’, अशी माहिती यशराज फिल्मशी संबंधित व्यक्तीने दिल्याचं वृत्त हाती आलं आहे. हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर यांच्या ‘कन्फेशन ऑफ अ ठग’ या पुस्तकावर आधारित असून त्यातून एका वेगळ्या जगताची सफर घडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.