बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी सिनेसमीक्षक आणि लेखिका भावना सोमय्या यांच्या ‘वन्स अपॉन टाइम इन इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात जुन्या सिनेमांचे नावाजलेले संवाद, काही न माहित असलेले मजेशीर किस्से सांगण्यात आले आहेत. भावना सोमय्या यांनी आतापर्यंत १२ पुस्तके लिहिली असून त्यात हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्या चरित्राचाही समावेश आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘माझ्यासाठी ठराविक असे कोणतेच दशक प्रिय आहे असे नाही. प्रत्येक दशकाने मला काही नवे शिकवले आहे. प्रत्येक दशक नेहमीच कुठल्या तरी पहिल्या वहिल्या आठवणींना तसेच कलाकारांना जन्म देत असतं. त्यामुळे आताच्या दशकापेक्षा आधीचे दशक चांगले होते असे म्हणणे योग्य ठरणार नाही.’

अमिताभ बच्चन यांच्या व्यावसायिक सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर बॉलीवूड सिनेदिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याच्या ‘बदला’ या सिनेमाबद्दल आतापर्यंत सातवेळा वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्येकवेळी या घोषणेत बदल झालेले दिसले. या सिनेमाकरिता क्रिअर्ज एन्टरटेनमेन्ट आणि झी स्टुडिओ संयुक्तरित्या काम करणार आहेत. सुरुवातीला या सिनेमात मुख्य भूमिकेत संजय दत्त आणि क्रिती सेनन दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण, आता संजूबाबाच्या जागी अमिताभ बच्चन आणि क्रिती सेननच्या जागी दिशा पटाणी यांची वर्णी लावण्यात आली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थने काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांना सिनेमाची कथा ऐकवली असून त्यांना ती खूप आवडली आहे.

दरम्यान, २८ व्या रस्ता सुरक्षा आठवड्याचे उद्घाटन करताना बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी मुंबई वाहतूक पोलिसांना आपला चेहरा आणि आवाज देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांना वाहतूक पोलिसांचा चेहरा बनायचे आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमिताभ म्हणाले होते की, ‘मला मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काही तरी करावेसे वाटते. मी गेली अनेक वर्ष संबंधित अधिकाऱ्यांना याबद्दल बोललोही आहे.’ ७४ वर्षीय या तगड्या अभिनेत्याने सांगितले की, ‘माझा चेहरा आणि आवाज जर मॅगी न्युडल्स आणि सिमेंट विकू शकते. तर हा चेहरा आणि आवाज शहर आणि समाजासाठी काही चांगले का नाही करु शकत.’ यावेळी त्यांनी रस्त्याच्या सुरक्षांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी सिनेमा निर्मितीचीही इच्छा व्यक्त केली. ज्या सिनेमांची संहिता चांगली आहे अशा जास्तीत जास्त सिनेमांची निर्मिती करायला मी तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते.