बॉलीवूड शहनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शक्ती’ आणि ‘नमक हलाल’ हे सुपरहिट चित्रपट करणा-या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची शनिवारी ६०वी जयंती होती. त्यादिवशी स्मिता पाटील यांच्यावरील पुस्तकाचे बीग बींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी बीग बींनी स्मिताजींच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी अमिताभ यांनी कुली चित्रपटावेळचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘कुली’च्या चित्रीकरणासाठी मी एकदा बंगळुरुला गेलो होतो. एके दिवशी मध्यरात्री २च्या सुमारास हॉटेलमधील फोन खणाणला. मला रिसेप्शनिस्टने सांगितले की, तुमच्यासाठी स्मिता पाटील यांचा फोन आला आहे. त्यावेळी मला धक्काचं बसला कारण इतक्या रात्री मी तिच्याशी कधीचं बोललो नव्हतो. पण, महत्त्वाचे काहीतरी काम असेल म्हणून मी तिच्याशी बोललो. स्मिताने मला विचारले की, तुमची प्रकृती कशी आहे, तुम्हाला काही झाले तर नाही ना? तर मी म्हणालो, हो माझी प्रकृती व्यवस्थित आहे. मग ती म्हणाली, मला तुमच्याबद्दल एक वाईट स्वप्न पडलं म्हणून मी इतक्या उशीरा तुम्हाला फोन केला. त्यानंतर त्याच्या दुस-याचं दिवशी अमिताभ यांचा ‘कुली’च्या सेटवर अपघात झाला. पण, याने ढासळून न जाता स्मिता मला रुग्णालयात फुलांचा गुच्छ घेऊन भेटावयास आली होती, असे अमिताभ म्हणाले.
स्मिता पाटील यांचा मृत्यू झाला त्यावेळी अमिताभ हे मॉरिशसमध्ये होते, असे त्यांनी सांगितले.