‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या आगामी ‘पिंक’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अखेर हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. या चित्रपटातील काही भागांवर सेन्सॉरने मारलेली कात्री वगळता आता ‘पिंक’ चा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. महिलांना उद्देशून वापरलेल्या अपशब्दांच्या दृश्यांवर सेन्सॉरची कात्री चालल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. असे असले तरीही पुरुष प्रधान समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातील काही दृश्यांकडे मात्र चित्रपटाची गरज पाहता सेन्सॉरने दुर्लक्ष केले आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना ‘चित्रपटाच्या ट्रेलरला या आधीच सेन्सॉर बोर्डाने यू/ए प्रमाणपत्र देऊ केले होते. या चित्रपटामागचा हेतू सेन्सॉर बोर्डाने हेरला असून माझ्या याआधीच्या चित्रपटांच्या मार्गातही सेन्सॉरने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे माझा सेन्सॉर बोर्डावर विश्वास आहे’, असे शूजित सरकार म्हणाला. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी याबाबत त्यांची प्रक्रिया देत असताना ‘पिंक आणि अकिरा या दोन्ही चित्रपटांचे कथानक मजबूत असून विषयाला थेट भिडणारे आहे. सहसा अशा प्रकारच्या चित्रपटांना ‘ए’ म्हणजेच प्रौढ प्रमाणपत्र दिले जाते. पण आम्ही या चित्रपटांना यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. पूर्व- प्रौढ प्रेक्षक, अल्पवयीन आणि पौगंडावस्थेतील प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सुरक्षित वातावरणापलीकडे उद्भवणाऱ्या संकटांबाबतची जाणीव करुन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे ते म्हणाले.
अमिताभ बच्चन या चित्रपटामध्ये एका वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. तापसी पन्नू, अंगद बेदी, किर्ती कुल्हारी आणि एंड्रिया तरिंग यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘पिंक’ या चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांची वाहवा मिळवली आहे. ‘पिंक’ या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीमध्ये झाले आहे. शूजित सरकार या चित्रपटाची निर्मिती करणार असून याआधी त्यांनी अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘पिकु’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘पिंक’ या चित्रपटाद्वारे बंगाली चित्रपट दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. १६ सप्टेंबरला अमिताभ यांचा ‘पिंक’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.