बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद याच्या ‘बदला’ या चित्रपटाबद्दल आतापर्यंत सातवेळा घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातही यात अनेकदा बदल झालेले दिसले. या चित्रपटाकरिता क्रिअर्ज एन्टरटेमेन्ट आणि झी स्टुडिओ संयुक्तरित्या काम करणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटात मुख्य भूमिकेत संजय दत्त आणि क्रिती सनॉन दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण, आता संजूबाबाच्या जागी अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉनच्या जागी दिशानी पटाणी यांची वर्णी लावण्यात आली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थने काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांना चित्रपटाची कथा ऐकवली असून त्यांना ती खूप आवडली आहे.

सदर चित्रपटाबाबत सर्व काही ठरल्यानंतर पुढच्या दहा दिवसात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे चित्रीकरण १० जुलै २०१६ रोजी सुरु होणे अपेक्षित होते. पण, अनेकदा काही ना काही बदल झाल्यामुळे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. याबाबत असेही बोलले जात होते की, चित्रपटाची कथा संजय दत्तला आवडली नव्हती. त्याच्या मते सदर कथेत पाश्चिमात्य गोष्टींचाच पगडा जास्त प्रमाणात दिसून येत होता. ‘बदला’ चित्रपटाची कथा एक वयोवृद्ध पुरुष आणि तरुणीवर आधारित आहे.

दरम्यान, २८ व्या रस्ता सुरक्षा आठवड्याचे उद्घाटन करताना बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी मुंबई वाहतूक पोलिसांना आपला चेहरा आणि आवाज देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना वाहतूक पोलिसांचा चेहरा बनायचे आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमिताभ म्हणालेले की, मला मुंबई वाहतूक पोलिसांसाठी काही तरी करावेसे वाटते. मी गेली अनेक वर्ष अधिकाऱ्यांना याबद्दल बोललोही आहे. ७४ वर्षीय या तगड्या अभिनेत्याने सांगितले की, माझा चेहरा आणि आवाज जर मॅगी न्युडल्स आणि सिमेंट विकू शकते. तर हा चेहरा आणि आवाज शहर आणि समाजासाठी काही चांगले का नाही करु शकत. यावेळी त्यांनी रस्त्याच्या सुरक्षांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी चित्रपट निर्मितीचीही इच्छा व्यक्त केली. ज्या चित्रपटांची संहिता चांगली आहे अशा जास्तीत जास्त चित्रपटांची निर्मिती करायला मी तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते.