सध्या  सगळीकडे चर्चा आहे ती फक्त आणि फक्त रजनीकांत यांच्या ‘कबाली’ची या चित्रपटाची. गेल्या दोन दिवसांपासून तर सोशल मीडियामध्येही कबाली ट्रेंडिंगमध्ये आहे. भारतातल्या जवळपास १२ हजार चित्रपट गृह, अमेरिका, लंडनपासून मलेशियापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पण आता या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर  कबालीच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन महत्त्वाची भूमिका करतील अशीही चर्चा आहे. कबाली हा अनेक भाषांत डब करण्यात आला आहे. रजनीकांत यांची प्रसिद्धी लक्षात घेता हा चित्रपट हिंदी भाषेत देखील डब करण्यात आला आहे. परंतु आता याचा रिमेक करून अमिताभ बच्चन यांना महत्त्वाची भूमिका देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’, ‘हम’ यांसारख्या चित्रपटातून एकत्र काम केले आहे.

वाचा : जाणून घ्या, काय आहे ‘कबाली’ची कथा

अमिताभ बच्चन हे रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत. याआधी रजनीकांत यांच्या रजनी स्टाईलचे अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले होते. हे दोन्ही कलाकार चांगले मित्र तर आहेत पण एकमेकांच्या कामांबद्दल दोघांनाही आदर आहे. त्यामुळे लवकरच ‘कबाली’ या चित्रपटाचा रिमेक येणार असून त्यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसतली या चर्चेला उधाण आले आहे. हिंदीबरोबरच मल्याळम, तेलगू, मलय भाषेत हा चित्रपट डब करण्यात आला आहे. पाहिल्याच दिवशी या चित्रपटाने २५० कोटी कमावल्याच्या देखील चर्चा आहेत. दक्षिणेत तर केवळ आणि केवळ कबाली पाहण्यासाठी काही कार्यालयाने सुट्टी दिली होती. कबालीचा रिमेक जेव्हा बनेल तेव्हा बनेल पण सध्या कबाली आणि रजनीकांतची जादू संपूर्ण जगावर पसरली आहे.

वाचा : रजनीकांतच्या ‘कबाली’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बक्कळ कमाई

वाचा : BLOG: तो रजनीकांत एक!