गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अफवा पसरत आहेत. ऐ दिल है मुश्किल चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या हिने नुकतीच डिझायनर मनिष मल्होत्राच्या वाढदिवसाला उपस्थिती लावली होती. तरीही या अफवांना लगाम लागला नाही. आऊटलूक पाकिस्तानसह इतर काही संकेतस्थळांनी यासंदर्भातील दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते. सासरच्यांना कंटाळून ऐश्वर्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी अफवा पाकिस्तानी संकेतस्थळांनी पसरवली होती.

अमिताभ बच्चन यांनी हिमेश रेशमियाच्या अल्बम लाँचला उपस्थिती लावली होती. त्यावेळी अमिताभ यांना त्यांची सून ऐश्वर्या हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या अफवा पसरत असल्याबाबत विचारले. त्यावर अमिताभ यांनी जो प्रतिसाद दिला तो उपस्थितांना चकित करणारा होता. सदर प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांनी केवळ एक नजर पाहिले आणि हलकेसे स्मित देत आपली मान वळवली. तरीही या अफवांवर कुजबूज चालूच होती. मात्र, अमिताभ यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत शांत राहणे पसंत केले. अशा बातम्यांना बळी पडलेली ऐश्वर्या ही पहिली अभिनेत्री नाही. याआधी खुद्द अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रजनीकांत आणि दिलीप कुमार यांच्याबद्दलही अफवा पसरवण्यात आल्या होत्या.

काय होते वृत्त?
ऐश्वर्याने स्वतःचे आयुष्य संपवून टाकण्यासाठी ट्रँक्विलायझर हे औषध अधिक प्रमाणात घेतले. बच्चन कुटुंबियांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी डॉक्टरांना घरीच बोलावले आणि तिच्यावर उपचार सुरु केले. बच्चन कुटुंबीय या घटनेला लपवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच त्यांनी ऐश्वर्याला रुग्णालयात घेऊन न जाता घरीच तिच्यावर उपचार केले. ज्या डॉक्टरांनी ऐश्वर्यावर उपचार केले, त्यांनाही ही घटना बाहेर कुठे सांगण्याची मनाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अभिषेक म्हणाला होता की, त्याला एका अशा सिनेमात काम करायचे आहे ज्यात संपूर्ण बच्चन कुटुंबिय असेल. ज्या डॉक्टरने ऐश्वर्याचे उपचार केले त्याने हे सर्व त्याचे नाव पुढे येणार नाही, या अटीवर सांगितले असेही त्या संकेतस्थळावर लिहिले आहे.