मराठीमध्ये काही सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधवने ‘बॅन्जो’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. रितेश देशमुख आणि नर्गिस फाख्री यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट जितक्या जोमाने प्रदर्शित झाला तितक्याच जोमाने तो पिछाडला असे म्हणायला हरकत नाही.

‘बॅन्जो’ या नावावरुनच नक्की हा सिनेमा काय असणार हे पाहण्याची सगळ्यांमध्येच उत्सुकता लागून राहिली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट कसा असेल यावर अनेक चर्चाही होत होत्या. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र रसिकांचा उत्साह मावळलेला पाहायला मिळाला. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पिंक’ चित्रपटाने राधिका आपटेच्या ‘पार्च्ड’ आणि रितेशच्या ‘बॅन्जो’ या चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम केला आहे. भक्कम कथानक आणि आमिताभ बच्चन व इतर सहकलाकारांच्या तगड्या अभिनयाच्या बळावर ‘पिंक’ चित्रपटाने सलग दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई केली. तर इथे कमकुवत कथानकाच्या कारणाने रवी जाधव दिग्दर्शित ‘बॅन्जो’ रसिकांना भुरळ घालण्यास सपशेल अयशस्वी ठरला आहे असे समीक्षकांचे म्हणणे आहे. जिथे ‘पिंक’ चित्रपटाने ५० कोटींच्या कमाईचा आकडा गाठला तिथेच ‘बॅन्जो’ला मात्र १० कोटींचा आकडा गाठतानाही अवघड जात आहे. ‘बॅन्जो’ चित्रपट १५०० स्क्रिन्सवर लागला प्रदर्शित झाला होता.

बच्चन यांच्या ‘पिंक’ चित्रपटाचा काही प्रमाणात राधिका आपटेच्या ‘पार्च्ड’लाही फटका बसला आहे. सामाजिक विषयाला साद घालणारे कथानक असणाऱ्या या चित्रपटाबाबत रसिकांमध्ये कुतूहल पाहायला मिळाले होते, पण ‘पिंक’ च्या तुलनेत या चित्रपटाची कमाई कमीच झाली होती. ‘पार्च्ड’ आणि ‘पिंक’ या चित्रपटांची चर्चा असतानाच रसिकांना अपेक्षा होत्या ते म्हणजे ‘बॅन्जो’ या चित्रपटाकडून. पण, दहा कोटींच्या कमाईचा आकडाही हा चित्रपट पार करु न शकल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. महाराष्ट्रातील बॅन्जो वादकांवर आणि त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटामध्ये रितेश देशमुख बॅन्जो वादकाची भूमिका साकारत असून, नर्गिस डीजेची भूमिका साकारत आहे. पण, प्रदर्शनानंतरच्या आठवडाभरातच या चित्रपटाने त्याचा गाशा गुंडाळला आहे असेच दिसतेय.