आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी बॉलीवूडचे सेलेब्रिटी जास्तीत जास्त सोशल माध्यमांचा वापर करीत असल्याचे दिसत आहे. बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक फेसबुक लाइव्ह चॅट केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली आहे.

तुमचे डिजिटायजेशनबद्दल मत काय आहे असे विचारले असता ते म्हणाले. या नव्या तंत्रज्ञानामुळेच तर तुम्ही आणि मी थेट संपर्कात येऊ शकलो. याचाच अर्थ अमिताभ बच्चन यांनी या नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत केले आहे.
अमिताभ बच्चन यांचे लाइव्ह फेसबुक चॅट म्हटल्यावर चाहत्यांना खूप उत्सुकता होती. चाहत्यांनी अमिताभ यांच्यावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार केला. आगामी चित्रपटापासून ते आवडते डॉयलॉग्स ते मधुशालाच्या काव्यवाचन अशा वेगवेगळ्या विषयांना त्यांनी हात लावला.

सुरुवातीलाच जयललितांच्या आठवणींबद्दल ते बोलले. भारतीय सिनेमाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर जयललितांनी एक कार्यक्रम घेतला होता. संपूर्ण देशातील सिनेमाचा गौरव त्यांनी त्या कार्यक्रमाद्वारे केला होता. त्यांच्या या कार्यासाठी मी त्यांना नेहमीच स्मरणात ठेवेल असे त्यांनी म्हटले.

आपल्या कार्यालयात असलेले एम. एफ. हुसैन यांचे पेंटिंग दाखवून ते आठवणींमध्ये रमले. १९८२ ला जेव्हा अमिताभ यांना कुली चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात झाला होता तेव्हा ते ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर जोरदार पाऊस सुरू होता आणि ढग, मोठे दगडच तेथून दिसत असत. त्यावर मी काही इंग्रजीत ओळी देखील लिहिल्या होत्या. हीच संकल्पना वापरुन एम.एफ.हुसैन यांनी एक चित्र काढून मला ते भेट दिल्याचे अमिताभ यांनी म्हटले.

हुसैन यांना घोडे खूप आवडत असत म्हणून त्यांनी या चित्रातही घोडे काढले असे अमिताभ म्हणाले.
अफगाणिस्तान, पाकिस्तान, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमधून लोकांनी त्यांना शुभेच्छा आणि प्रश्ने पाठवली होती. त्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत संयमाने उत्तरे दिली.