अभिनेत्री अमृता सिंग चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहापासून काहीशी दूर असली तरीही अभिनय क्षेत्रापासून ती दुरावलेली नाही हेच खरे. ‘२ स्टेट्स’ या चित्रपटामध्ये अमृताने अर्जुन कपूरच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटातून अस्सल पंजाबी आईच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अमृताने अनेकांचीच दाद मिळवली होती. गेल्या काही दिवसांपासून अमृता पुन्हा एकदा अर्जुन सोबत एकाच चित्रपटातून झळकणार असल्याचे जवळपास नक्कीच झाले होते. आगामी ‘मुबारका’ या चित्रपटाद्वारे अमृता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृताने या चित्रपटातील भूमिकेसाठी नकार दिला आहे.

अनीस बाझमी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एका पंजाबी कुटुंबातील नात्यांवर भाष्य केले जाणार आहे. ‘डेस्टिनेश वेडिंग’च्या निमित्ताने विविध ठिकाणी फिरणाऱ्या एका पंजाबी कुटुंबाची पार्श्वभूमी या चित्रपटाला देण्यात आली आहे. ‘मुबारका’ या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर दुहेरी भूमिकेमध्ये दिसेल. तर, अभिनेता अनिल कपूर त्याच्या काकांच्या भूमिकेत दिसेल असे कळत आहे. याच चित्रपटील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री अमृता सिंगला विचारण्यात आले होते. अमृताही या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तयार झाली होती. पण, त्यानंतर मात्र तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. काही खाजगी कारणांमुळे चित्रपटाच्या ठरलेल्या तारखांना ती वेळ नाही देऊ शकत असे कारण देत तिने ही भूमिका नाकारली आहे.

अमृताचे हे खाजगी कारण आहे तिची मुलगी सारा. सध्या अमृता तिच्या मुलीच्या बृलिवूड पदार्पणावरच जास्त लक्ष देत आहे. त्यामुळे ती इतर कोणत्याही कामामध्ये स्वत:ला गुंतवू इच्छित नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या अमृता तिच्या मुलीसाठी म्हणजेच सारासाठी एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात आहे. ती स्वत:च्या करिअरपेक्षा स्वत:च्या मुलीच्या करिअरवर आणि बॉलिवूड पदार्पणावरच जास्त लक्ष देत आहे. म्हणूनच अमृताने ‘मुबारका’ या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. दरम्यान या चित्रपटातील आपल्या लूकवरुन पडदा उचलत अभिनेता अर्जुन कपूरने काही दिवसांपूर्वीच एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंचवरुन शेअर केला होता. ‘मुबारका’ या चित्रपटात अर्जुन कपूर, अथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रूझ यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २८ जुलैला प्रदर्शित होईल.