आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाणारी राखी सावंत लवकरच चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या वाचाळपणासाठी प्रसिद्ध असलेल्या राखीने काही चित्रपटांमधून दुय्यम स्वरुपाच्या भूमिका साकारण्याबरोबरच अनेक चित्रपटांमधून आयटम डान्स सादर केला आहे. मोठ्या पडद्यावर मादक नृत्य साकारणाऱ्या राखीची ‘आयटम गर्ल’ म्हणून जास्त ओळख आहे. आपल्या या प्रतिमेला छेद देण्यासाठी तिने ‘एक कहानी ज्युली की’ चित्रपट स्वीकारला असून, चित्रपटात ती लिड रोलमध्ये दिसेल. ‘एक कहानी ज्युली की’ या आगामी चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली, एक अभिनेत्री म्हणून साचेबद्धतेमध्ये न अडकता मला प्रयोगशील व्हायला आवडते. चित्रपटातील माझी भूमिका कणखर आणि अर्थपूर्ण असून, त्याला विविध पदर आहेत. अशा प्रकारची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. प्रथमच माझ्यातील प्रतिभेला आव्हान देत मी अशा प्रकारची भूमिका साकारत आहे, फार कमी अभिनेत्रींनी अशा प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ही भूमिका माझ्या वाट्याला येणे हे मी माझे भाग्य समजते. क्षणाचाही विचार न करता मी होकार दिला. माझ्या प्रयत्नांना सिनेरसिक आणि चित्रपटसृष्टी कसा प्रतिसाद देते ते पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.

दरम्यान, तिने परिधान केलेल्या मोदी ड्रेसमुळे काही दिवसांपूर्वी ती चर्चेत आली होती. काहीही करुन माध्यमांचे लक्ष स्वतःकडे ओढून घेण्यात तरबेज असलेल्या राखीने एक पाऊल पुढेच टाकत फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन्स यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ने असा ड्रेस परिधान केला होता ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. अनेक ठिकाणी मोदींचे छायाचित्र प्रिंट केलेला काळ्या रंगाच्या ड्रेसवर तिने घातला होता. केवळ हा ड्रेस परिधान करून ती स्वस्थ बसली नाही तर सोशल मीडियावर या ड्रेसमधला स्वताचा फोटोदेखील शेअर केला होता. राखीने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले होते. हे फोटो इंटरनेटवर येताच काही तासांमध्ये व्हायरल झाले होते. ट्विटरवरही अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. काहींनी राखीला मोदींची एक नंबरची फॅन बनवलं तर काहींच्या मते तो मेड इन इंडियाचा ड्रेस होता. तर अनेकांनी या फोटोवरून राखी सावंतवर टीका केली होती. नंतर, पंतप्रधान आणि भाजप नेत्यांच्या संमतीनेच ड्रेसवर आपण मोदींचे फोटो प्रिंट केल्याचा दावा राखीने केला होता.

याआधीही प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर राखीने सिलिंग फॅनवर बंदी आणण्याची मागणी केली होती. तिच्या मते, सिलिंग फॅनमुळेच जास्तीत जास्त आत्महत्या होत असतात. त्यामुळे अशा फॅनवर लवकरात लवकर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी तिने केली होती.