माहिती तंत्रज्ञानाचे महाजाल (इंटरनेट), स्मार्ट भ्रमणध्वनी, यू टय़ूब आणि विविध वाहिन्यांमुळे गाणी ऐकणे हा प्रकार आता ‘पाहणे’ही झाला आहे. ही सर्व माध्यमे तसेच ‘एफएम’ रेडिओमुळे चित्रपटातील गाणी कानावर सातत्याने आदळत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून ही गाणी सर्वत्र ‘गाजविली’जातात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नव्या किंवा आगामी चित्रपटातील गाणी ऐकणे सध्याच्या काळात दुर्मीळ राहिलेले नाही. गेल्या काही वर्षांपासून प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दर आठवडय़ाला किमान दोन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘टाइमपास-२’, ‘मुंबई पुणे मुंबई-२’ आणि ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाणी अमाप लोकप्रिय झाली. ‘कटय़ार’मधील सर्वच गाण्यांमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण पिढीत शास्त्रीय संगीत व नाटय़संगीताविषयी आवड निर्माण करण्याचे खूप मोठे काम केले. या वर्षांत प्रदíशत होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आयटम साँग, ढिणचॅक आणि भावनाप्रधान, हळुवार गाण्यांवरच भर राहणार असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट बदलला असून वेगवेगळ्या विषयांवरील मराठी चित्रपट सातत्याने प्रदर्शित होत असून या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मराठी तरुण पिढीही चित्रपटगृहात जाऊन नव्याने प्रदर्शित झालेले चित्रपट आवर्जून पाहात असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्ट भ्रमणध्वनी आणि माहितीच्या महाजालामुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून ते आगामी चित्रपटापर्यंतची गाणी सगळ्यांना सर्रास पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही या गाण्यांचा वापर केला जात आहे. हिंदीप्रमाणेच आता मराठीतही काही वाहिन्यांवरून फक्त चित्रपटांची गाणी किंवा खासगी आल्बममधील गाणी सादर होत असतात. त्यामुळे ही गाणी सहज तोंडात रुळण्यास किंवा लोकप्रिय करण्यात या वाहिन्यांचाही मोठा हातभार लागत आहे. या वर्षांत प्रदíशत होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आयटम साँग, ढिणचॅक आणि भावनाप्रधान, हळुवार व प्रेम गीतांवरच भर राहणार असल्याचे चित्र आहे.

‘कटय़ार’ची सर्व गाणी लोकप्रिय

सरत्या वर्षांत दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील सर्व गाणी लोकप्रिय ठरली. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण पिढीत नाटय़संगीत आणि शास्त्रीय संगीताविषयीची आवड निर्माण करण्यात ‘कटय़ार’च्या सर्वच गाण्यांनी खूप मोठा हातभार लावला. भ्रमणध्वनीवरील ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या माध्यमातूनही ‘कटय़ार’च्या गाण्यांची मोठय़ा प्रमाणात देवाणघेवाण झाली. संगीतप्रेमी श्रोते आणि रसिकांसाठी ‘कटय़ार’ची गाणी म्हणजे अक्षरश: मेजवानीच होती. २०१५ या वर्षांत ‘टाइमपास-२’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. ‘टाइमपास-१’या चित्रपटातील ‘मला वेड लागले’, ‘ही पोली साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद’ ही गाणी खूप लोकप्रिय झाली होती. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच अनेक तरुणांची ही गाणी तोंडपाठ झाली होती. त्यामुळे ‘टाइमपास-२’ या चित्रपटातील गाण्यांकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिच्यावर चित्रित झालेले ‘मदन पिचकारी’, प्रिया बापट व प्रियदर्शन जाधव यांचा सहभाग असलेले ‘प्राजू’ (दोन्हीचे संगीत-चिनार महेश) याच चित्रपटातील विशाल धडलानी यांनी गायलेले ‘वॉऊ वॉऊ’, ‘तू मिला’ ही गाणीही रसिकांनी उचलून धरली. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातील वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे यांच्यावर चित्रित झालेले ‘रंग हे नवे नवे’ हे गाणेही तरुणाईच्या विशेष पसंतीचे ठरले. याच चित्रपटातील संजीवनी भेलांडे यांनी गायलेले ‘तू असतीस तर’ यालाही वरून तरुणांनी आपले म्हटले.

‘तू ही रे’ चित्रपटातील अमितराज व बेला शेंडे यांनी गायलेले ‘तोळा तोळा’, ‘निळकंठ मास्तर’ चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेले ‘अधीर मन जाहले’, ‘डबलसीट’ चित्रपटातील आनंदी जोशी व जसराज जोशी यांनी गायलेले ‘किती सांगायचंय मला’, ‘मितवा’ चित्रपटातील ‘तू ही रे माझा मितवा’ ही गाणी सुपरहिट झाली, रसिकांच्या ओठांवर सहजच रुळली असे म्हटले तर वावगे ठरू नये.  ‘मुंबई पुणे मुंबई-२’ चित्रपटातील बेला शेंडे व हृषीकेश रानडे यांनी गायलेले ‘साथ दे तू मला’ तसेच ‘कांकण’ (नेहा राजपाल व शंकर महादेवन), ‘का दूर मी सांग ना’ (तुझिया विना मर जावा), मन मंदिरा, दिल की तपीश, सूरत पिया की (सर्व गाणी –  कटय़ार काळजात घुसली), मोरया (दगडी चाळ), ‘गजानना गजानना’ (लोकमान्य टिळक)या भावनाप्रधान, प्रेम गीते व शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांबरोबरच ‘शिट्टी वाजली, गाडी सुटली अन् पदर गेला वर’ (रेगे), ‘पोपट पिसाटला’ (शिनिमा), ‘गुलाबाची कळी’ (तू ही रे), ‘बेंडबाजा’ (मुंबई पुणे मुंबई-२) ही उडत्या चालीची गाणीही दीर्घकाळ वाजत राहिली.

या वर्षांतही हा कल कायम राहणार

आयटम साँग आणि उडत्या चालीच्या गाण्यांबरोबरच हळुवार, भावनाप्रधान प्रेमगीतांनाही नव्या पिढीची विशेष पसंती मिळाली असल्याचे चित्र सरत्या वर्षांत दिसून आले. ‘कटय़ार काळजात घुसली’ चित्रपटाच्या निमित्ताने शास्त्रीय व नाटय़ संगीतावर आधारित असलेली सर्व गाणीही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण पिढीलाही भावली असल्याचे दिसून आले. त्यामुळे नव्या वर्षांतही हाच कल कायम राहणार असल्याचे चित्र आहे.