अभिनयासोबतच सर्वांच्याच मनावर तिच्या सौंदर्याने राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अँजेलिना जोली. गेल्या काही दिवसांपासून अँजेलिना चर्चेत आहे ते म्हणजे ब्रॅड पीट आणि तिच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे. पण, सध्या मात्र सोशल मीडियावर अँजेलिनाचे चर्चेत येण्याचे कारण जरा वेगळेच आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अँजेलिनाचे पाककौशल्य पाहण्याची संधी मिळत आहे. कोणा एका सेलिब्रिटीचे पाककौशल्य हा विषय कोणासाठी नवीन नसला तरीही अँजेलिनाचे हे आगळेवेगळे स्वयंपाक कौशल्य पाहणे नक्कीच चर्चेत आले आहे.

एका चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने बीबीसी वर्ल्ड न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या पाककलेची झलक दाखवली आहे. सहसा भाज्या, फळं आणि मांस या घटकांच्या मदतीने पाककृती बनविण्यास प्राधान्य दिले जाते. पण, या व्हिडिओमध्ये पाहिल्यास लक्षात येत आहे की, अँजेलिना चक्क कोळी आणि विंचू शिजवत आहे. इतकेच नव्हे, तर ती तिच्या मुलांनाही विंचू आणि कोळी खाण्याचे फायदे सांगत आहे. ज्यावेळी बिकट प्रसंगी अनेकांना भूक सतावत होती तेव्हा असेच खाद्यपदार्थ खाऊन अनेकांनी त्यांचा उदरनिर्वाह केला असल्याचेही जोली या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे.

कम्बोडियामध्ये अँजेलिना विंचू आणि कोळी कसे शिजवायचे याबद्दलची सविस्तर प्रक्रियाही सांगताना दिसत आहे. मॅडॉक्स, पॅक्स, झारा, शिलो, क्नॉक्स आणि विवियन ही मुलंही अँजेलिनाला साथ देत आहेत. सध्या या व्हिडिओने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. विंचू आणि कोळी चवीने खाणे ही साधीसोपी बाब नाही. दरम्यान या व्हिडिओमध्ये अँजेलिना पहिल्यांदा किटक खाण्याच्या अनुभवाचाही खुलासा करताना दिसत आहे. २००२ मध्ये कम्बोडियाच्या मॅडॉक्सला जेव्हा तिने दत्तक घेतले होते त्यावेळी पहिल्यांदा अँजेलिनाने किटक खाल्ले होते. एक आघाडीची अभिनेत्री असं काहीतरी खाणं म्हणजे चर्चा तर होणारच. अशीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.