अभिनेत्री कतरिना कैफ हिने नुकतेच काही छायाचित्रकारांना फटकारल्याची घटना घडली आहे. प्रसारमाध्यमे आणि छायाचित्रकारांपासून सहसा लांब राहणे पसंत करणाऱ्या कतरिनाला तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याला चर्चेचा मुद्दा बनवणे पसंत नाही आहे. रणबीर कपूरसोबतच्या तिच्या ब्रेकअपनंतरही तिने प्रसारमाध्यमांना टाळणेच योग्य समजले होते.
यापूर्वीच कतरिनाने काही छायाचित्रकारांनी तिला कोणतीही कल्पना न देता फोटो काढल्यामुळे खडसावले होते. कतरिनासोबत हाच प्रकार पुन्हा घडला. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य याच्यासोबत नृत्याच्या सरावानंतर स्टुडिओतून बाहेर पडताना कतरिनासोबत हा प्रकार घडला. स्टुडिओतून बाहेर पडलेली कतरिना तिच्या कारमध्ये बसायला जाणार इतक्यातच काही फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. हे पाहून कतरिना कारमधून बाहेर आली आणि तिने छायाचित्रकारांना खडसावले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कतरिनाने त्या छायाचित्रकारांना ‘त्यांच्या या कृत्यासाठी पोलिसात तक्रार करेन’ अशी भीतीही घातली. कतरिना कैफ आणि बॉलिवुडच्या अशा अनेक अभिनेत्रींचा त्यांच्या नकळत पाठलाग करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अनेकदा खडसावण्यात आले आल्याच्या घटना आजवर घडल्या आहेतच. काही दिवसांपूर्वीच कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळी काही माध्यमांनी तिच्या गाडीचा पाठलाग केला होता, अशा वेळी संतापलेल्या कतरिनाने कारच्या बाहेर येत एका प्रसारमाध्यमांसमोर एका फोटोसाठी पोझ दिली आणि त्यांना पाठलाग न करण्याची विनंती केली होती. कलाकारांच्या खासगी अयुष्यावर माध्यमांच्या असणाऱ्या करड्या नजरीमुळे माध्यमे आणि कलाकारांमधील नात्यातील दरी आणखीनच रुंदावत आहे.