ज्येष्ठ गांधीवादी आणि सामाजिक कार्यकर्ता किसन बाबूराव हजारे म्हणजेच अण्णा हजारे हे लवकरचं प्रसिद्ध ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार आहेत. अण्णा हजारे यांच्या जीवनावरील आधारित ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता त्यांनी या शोला उपस्थिती लावली  होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे शुक्रवारी उशिरा रात्री शूटींगसाठी ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर गेले. ते पहिल्यांदाच एखाद्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसणार आहेत. अण्णा त्यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटाची प्रसिद्धी या शोमध्ये करणार आहेत. ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ या चित्रपटाची लांबी दोन तास दहा मिनिटे आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अण्णा हजारेंचे गाव राळेगण सिद्धी, अहमदनगर (महाराष्ट्र), मुंबई, नई दिल्ली, जम्मू आणि कश्मीर, लडाख आणि राजस्थान येथे करण्यात आले आहे. राइज पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड या चित्रपटाची निर्मिती करत असून दिग्दर्शक शशांक उदापुरकरने याचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्यांदाच दिग्दर्शन करत असलेला शशांक हा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. त्याने चित्रपटात अण्णांची व्यक्तिरेखा साकारण्यासह चित्रपटाची पटकथा आणि संवादही लिहले आहेत. शशांक व्यतिरिक्त ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ चित्रपटामध्ये अभिनेत्री तनिषा मुखर्जीही देखील झळकेल. यात ती एका तरुण पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून अण्णा हजारेंच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी जोडलेल्या कठीण प्रसंगाना रेकॉर्ड करताना दिसेल. या हिंदी बायोपिकमध्ये तीन गाण्यांचाही समावेश आहे.  ‘द कपिल शर्मा शो’ शी कपिल शर्मा, नवजोत सिंह सिद्धू, सुनील ग्रोवर, चंदन प्रभाकर, कीकू शारदा, अली असगर आणि सुमोना चक्रवर्ती यांसारखे कलाकार जोडले गेले आहेत. सुनील ग्रोवरने अण्णा हजारे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करून त्यांच्या उपस्थितीवर मोहोर लावली आहे.