सेलिब्रिटींभोवती चाहत्यांचे वलय नेहमीच पाहायला मिळत. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण या उत्सुकतेमध्ये सेलिब्रिटीदेखील एक माणूसच आहेत हे ते विसरून जातात. असाच एक किस्सा बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्यासोबतही घडला आहे. कोलकाता विमानतळावर विद्यासोबत झालेल्या गैरवर्तणुकीनंतर तिने ‘आम्ही पब्लिक फिगर जरी असलो तरी पब्लिक प्रॉपर्टी नाही हे लक्षात ठेवावे’, असे एका मुलाखतीत म्हटले. याच मुलाखतीत तिने तिच्यासोबत घडलेला आणखी एक प्रसंग सांगितला.

विद्या एकदा सिद्धिविनायक मंदिरात गेली होती. त्याचवेळी तिच्यासोबत ही घटना घडलेली. याविषयी सांगताना विद्या म्हणाली की, मी डोळे बंद करून देवाची प्रार्थना करण्यात मग्न होते. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्या खांद्याला हात लावला. शरीराला स्पर्श झाल्याची जाणीव होताच मी डोळे उघडले आणि ‘हाss’ असे चकीत होऊन म्हटले. त्यावर, ‘ही माझी बायको आहे. तिला तुम्ही हॅलो असे म्हणा,’ असे त्या व्यक्तीने मला सांगितले. मला आधी प्रार्थना करू देत असे म्हणत मी पुन्हा डोळे बंद केले. पण, पुन्हा त्या व्यक्तीने माझ्या खांद्याला स्पर्श केला आणि हॅलो म्हणण्यास सांगितले. त्यावर ‘तुम्ही आधी माझ्या शरीराला स्पर्श करणं बंद करा. तुमच्या पत्नीला कोणी असा हात लावला तर तुम्हाला आवडेल का? किंवा तुमच्या पत्नीला आवडेल का?’ असं मी त्यांना विचारलं. सेलिब्रिटी आहोत याचा अर्थ तुम्ही आमच्याशी कसेही वागाल असा होत नाही. सेल्फीसाठी पोज किंवा ऑटोग्राफ देण्यासाठी मी क्वचितच नाही म्हणते. पण, प्रत्येक गोष्टीच्या काहीतरी मर्यादा असतात, या शब्दांत विद्याने अतिउत्साही चाहत्यांचा समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वीच विद्या तिच्या आगामी ‘बेगम जान’ चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्त कोलकाता येथे गेली होती. तेथे एका चाहत्याने विद्याकडे सेल्फीची मागणी केली. त्यावर तिनेही तो देण्याची तयारी दर्शवली होती. पण, सेल्फी काढण्याच्या निमित्ताने त्या व्यक्तीने विद्याला न विचारता तिच्या कमरेवर हात ठेवला. त्यावर विद्याने लगेच त्याला असे न करण्यास सांगितले. विद्याच्या मॅनेजरनेही त्या व्यक्तीला समजावले पण दुसऱ्यांदा सेल्फी काढतानाही त्याने तसेच केले. तेव्हा मात्र विद्याने त्याला मागे ढकलले आणि चांगलेच सुनावले होते.

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीवर असलेले प्रेम व्यक्त करणे चुकीचे नाही. पण, आपण ते कोणत्या मार्गाने आणि कशा पद्धतीने व्यक्त करतोय ते महत्त्वाचे असते. अनेकदा चाहत्यांच्या अशा वागण्यामुळे सेलिब्रिटींना बराच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसते.