क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवायची महत्त्वाकांक्षा बाळगून असणाऱ्या राधासमोर अन्य तरुणींप्रमाणेच विवाहाची जबाबदारीही येऊन पडते, अशी काहीशी वेगळी कथा घेऊन ‘तमन्ना’ ही नवीन मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दाखल झाली आहे. अजिंक्य देव आणि अभिनय देव यांची निर्मिती असलेल्या या हिंदी मालिकेत मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे ही पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे. गेल्याच वर्षी दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातही अनुजाने बाजीरावाच्या बहिणीची भूमिका केली होती. मात्र चित्रपटाचा अनुभव खूप काही शिकवून गेला असला तरी ही मालिका म्हणजे आपल्यावरची मोठी जबाबदारी आहे, असे अनुजाने सांगितले.

‘राखणदार’ चित्रपटात मी अजिंक्य देव यांच्याबरोबर काम करत होते. त्याच वेळी त्यांनी या मालिकेची मला कल्पना दिली होती. ऑडिशन्स, लुक टेस्ट अशा मोठय़ा प्रक्रियेतून बाहेर पडावं लागेल, असंही त्यांनी सांगितलं होतं आणि झालंही तसंच. सात ते आठ महिन्यांच्या प्रक्रि येतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर माझी या भूमिकेसाठी निवड झाली. त्यामुळे ही मालिका माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, असं अनुजा म्हणते. या मालिकेतली राधा ही तरुणी क्रिकेटच्या खेळात आपली कारकीर्द घडवू पाहते आहे. त्यामुळे अर्थातच क्रिकेट आणि त्याचे सामने हे या मालिकेत महत्त्वाचा भाग असणार आहेत. क्रिकेट हे आपल्या रक्तातच आहे, या अर्थाने आपल्याला क्रिकेटची आवड आहे, कित्येक सामने पाहण्याचा आनंद घेतला असला तरी प्रत्यक्षात कधी हातात बॅट घेऊन खेळायची वेळ आली नव्हती, असं तिने स्पष्ट केलं. या मालिकेसाठी म्हणून महिनाभर मी क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. क्रिकेटरची देहबोली कशी असते? हातात बॅट कशी धरायची? अशी सगळी बाराखडी मी शिकले आहे, असं तिने सांगितलं.

अनुजासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपटही एक वेगळा अनुभव ठरला आहे. भन्साळींचा चित्रपट असल्याने त्यांच्या सेटवर प्रवेश केल्यापासूनच आम्ही त्या भव्यतेत हरवून जायचो. एवढय़ा मोठय़ा सेट्सवर अभिनय करायचा या कल्पनेनेच आम्ही थरारून जायचो, असं सांगणाऱ्या अनुजाने तिच्यासोबत घडलेला एक गमतीदार किस्साही कथन केला. आपल्या तोंडात इंग्रजी शब्द इतके बसलेले असतात. या चित्रपटात एका प्रसंगात म्हणजे जेव्हा बाजीराव शनिवारवाडय़ात प्रवेश करतात त्यावेळी माझ्या तोंडी एक संवाद होता. ‘उखाणा नाही घेतला तर कमरें में प्रवेश नही मिलेगा’, हे वाक्य म्हणताना मी प्रवेश म्हणण्याऐवजी चुकून एंट्री म्हणून गेले आणि एकच हशा पिकला. त्यावेळी रणवीरने माझी बाजू सावरून घेतली. मीसुद्धा एकदा चुकून सॉरी म्हणून गेलो आहे एका संवादात..असं म्हणत त्याने माझी समजूत काढली. तो एक प्रसंग सोडला तर हा चित्रपट म्हणजे सातत्याने शिकणे होते, असे अनुजा म्हणते. या मालिकेच्या निमित्ताने अजिंक्य देव आणि अभिनय देव या दोन दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळाली आहे, याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. अभिनय खूपच हुशार आहे. या मालिकेसंदर्भातील त्याच्या अपेक्षा, त्याची विचार करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी हटके आहेत. त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो, असं अनुजाने सांगितलं.  मालिका प्रदर्शित झाल्यापासून मला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. सध्या तरी या मालिकेवरच मी लक्ष केंद्रित केले आहे, असं तिने सांगितलं.