अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दिलजित दोसांज यांच्या’फिल्लौरी’ चित्रपटाला उत्तर भारतामध्ये दमदार प्रतिसाद मिळत असून चित्रटाने पहिल्या दिवसापेक्षा अधिक कमाई केली आहे. शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशी ४.२ कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटाने शनिवारी बॉक्स ऑफिसवर ५.२० कोटींची कमाई करत दोन दिवसात ९.२२ कोटींचा गल्ला जमविला आहे. पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता, हा आकडा रविवारी आणखी वाढेल, असा अंदाज चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटवरुन वर्तविला आहे. आखाती देशांमध्ये या चित्रपटाने गुरुवारी आणि शुक्रवार या दोन दिवसांमध्ये १.७० कोटी इतकी कमाई केली आहे.

यापूर्वी अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन या जोडीचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार प्रदर्शन केले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल १२. २५ कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवशीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे १४ व्या दिवशीच या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या निर्मितीत बनलेला ‘फिल्लौरी’ शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. एनएच १० नंतर अनुष्काची निर्मिती असलेला हा दुसरा चित्रपट आहे.

‘फिल्लौरी’ मध्ये शशी नावाच्या भूताची भूमिका साकारणाऱ्या अनुष्काने #ShashiWasThere या हॅशटॅगने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चांगलीच मेहनत घेतली होती. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, याची उत्सुकता होती. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाने फारशी चांगली कमाई केल्याचे दिसले नाही. दुसऱ्या दिवशीचा बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा वाढल्यामुळे अनुष्का शर्मा नक्कीच समाधानी असेल. ‘फिल्लौरी’मध्ये अनुष्का शर्मा, पंजाबी अभिनेता, गायक दिलजित दोसांज, सूरज शर्मा आणि मेहरीन पिरजादा यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनुष्काच्या क्लीन स्लेट फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओने संयुक्तपणे याची निर्मिती केलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अन्शै लालने केले आहे.