अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या आगामी ‘फिल्लौरी’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या फोटोंना सोशल मीडियावर उधाण आल्याचे पाहायला मिळाले असताना अनुष्काचा आणखी एक फोटो आता तिच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरणार असल्याचे दिसते. अनुष्काने नुकतेच लोकप्रिय अशा ‘वोग’ इंडिया मासिकासाठी फोटोशुट केले आहे. वोग इंडिया मासिकाच्या मार्चच्या अंकामध्ये अनुष्का शर्मा मुखपृष्ठावर झळकणार आहे. यासाठी तिने पांढरा टी- शर्ट आणि काळ्या स्कर्टमध्ये फोटोशुट केले आहे. या फोटोतील अनुष्काची अदा लक्षवेधी अशीच आहे. अनुष्का शर्माने ट्विटरवरुन तिचा फोटो शेअर केला असून या महिन्यात वोग इंडिया..असे कॅप्शनही तिने दिले आहे.

अनुष्काचा हा फोटो तरुण विश्वाने क्लिक केला आहे. या फोटोशुटसाठी तिची स्टाइल अनैता अदजानिया, केशरचना गैब्रिअल जिओगियो आणि मेकअप अनिल चिनप्पा यांनी केला आहे. बोल्ड अवतारामध्ये दिसणारी अनुष्का या फोटोमध्ये एका वेगळ्या अंदाजात लक्षवेधून घेताना दिसते. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता दिलजित दोसांज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फिल्लौरी’ या चित्रपटाची सध्या बॉलिवूड वर्तुळात चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षक आणि समीक्षकांनी अनुष्काच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती मिळक असल्याचे चित्र आहे. ट्रेलरमागोमाग सध्या या चित्रपटाचे पोस्टरही चर्चेत आहे. अनुष्का आणि दिलजितच्या लूकपासून ते अगदी या चित्रपटाच्या हटके कथानकाविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. चित्रपटातील दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. ‘दम दम…’ या पहिल्या गाण्यानंतर आता ‘वॉट्स अप’ हे लग्नसराईसाठी साजेसे असे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. मिका सिंग आणि जसलीन रॉयल यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘फिल्लौरी’ चित्रपट हा एका भूताची प्रेमकथा आहे. अनुष्का शर्मा, दिलजीत दोसांज आणि सूरज शर्मा यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. यात भूत दाखविण्यात आलेली शशी (अनुष्का) ही मेल्यावरही आपल्या प्रियकराच्या प्रतिक्षेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. शशीच्या प्रियकराची भूमिका दिलजीतने साकारली आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारा अभिनेता दिलजित दोसांज आता बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावत आहे. त्यामुळे अनुष्का आणि दिलजितची एका वेगळया काळातील ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही उत्सुतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. २४ मार्चला अनुष्का आणि दिलजितचा हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

https://www.instagram.com/p/BQ7lKcNlLf4/