‘बाहुबली २’ प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटले असले तरीही या चित्रपटाचं प्रेक्षकांमध्ये असलेलं वेड काही कमी झालेलं नाही हेच खरंय. ‘अमरेंद्र बाहुबली’, ‘भल्लालदेव’, ‘शिवगामी’, ‘देवसेना’ या सर्व पात्रांनी प्रेक्षकांवर अशी काही छाप पाडली आहे की, सर्वत्र त्यांच्याच गाजावाजा पाहायला मिळतोय. एस.एस. राजामौलींनी मोठ्या कलात्मकतेने आणि बरेच बारकावे टिपत ही पात्र मोठ्या पडद्यावर आणली. त्यातही कलाकारांच्या अभिनयामुळे त्या भूमिका वास्तवदर्शी वाटू लागल्या. या सर्वांमध्ये महत्त्वाचा वाटा होता तो म्हणजे कलाकारांच्या भूमिकांना साजेसा त्यांचा मेकअप आणि एकंदरच संपूर्ण लूकचा.

प्रभास आणि राणा डग्गुबतीप्रमाणेच अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या लूकनेही अनेकांची मनं जिंकली होती. तिने साकारलेल्या ‘देवसेने’च्या भूमिकेसोबतच गाजला तो म्हणजे अनुष्काचा लूक. या लूकची इतकी प्रशंसा झाली की अनेक तरुणींना तिच्याप्रमाणे दिसण्याचा मोह आवरता आला नाही. हीच बाब लक्षात घेत सध्या यूट्युबवर अक्षरा राव या यूट्युबरने देवसेनेचा लूक कसा कॅरी करायचा आणि तिच्याप्रमाणे कसं तयार व्हायचं यावर आधारित काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

‘देवसेने’प्रमाणे मेकअप करण्यासाठीचे हे व्हिडिओ सध्या प्रचंड चर्चेत असून त्या चॅनलचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढतच आहेत. ‘डीआयव्हाय’ म्हणजेच ‘डू-इट-युवरसेल्फ’च्या या व्हिडिओमध्ये देवसेनेसारखा डोळ्यांचा मेकअप, तिची हेअरस्टाईल आणि चेहऱ्याचा मेकअप हे सर्व काही अगदी सोप्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. तेव्हा आता टप्प्या-टप्प्याने देण्यात आलेल्या या मेकअप टिप्स कितीजणी अवलंबतात हे सोशल मीडियावरील फोटो पाहून कळेलच.

दरम्यान, अभिनेत्री अनुष्का शेट्टी म्हणजेच सर्वांच्या मनात घर केलेली ‘देवसेना’ सध्या कोणत्याही चित्रपटामध्ये व्यग्र नसल्याचं म्हटलं जातंय. पण, कामाचा उंचावणारा आलेख पाहता येत्या काळात ती काही मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग होऊ शकते असाही अंदाज वर्तवला जात आहे. बॉलिवूडमध्येही अनुष्काच्या पदार्पणाच्या चर्चांना उधाण आलं असून येत्या काळात याबद्दलची अधिकृत माहिती समोर येईल, असं म्हटलं जात आहे.