मराठी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप पडून हिंदी सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. राजेश शृंगापुरे हे मराठी सिनेजगतातलं असंच एक नावाजलेलं नाव. अर्जुन रामपाल याचा बहुचर्चित ‘डॅडी’ या सिनेमात राजेश महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

दुसऱ्यांदा बाबा झाला फरदीन खान, बाळाचे नाव

‘डॅडी’ सिनेमातील ‘बी.आर.ए’ गँगमधील बाबू, रमा आणि अरुण या तिघांच्या आयुष्याभोवती हा सिनेमा फिरतो. यातील रमा या कुख्यात गुंडाची व्यक्तिरेखा राजेश साकारत आहे. ‘स्वराज्य’, ‘संघर्ष’ अशा अनेक मराठी सिनेमात राजेशने लक्षवेधी भूमिका साकारल्यात.’झेंडा’ या सिनेमातल्या त्याच्या भूमिकेचेही प्रेक्षकांनी कौतुक केले. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

या ट्रेलरमध्ये कुख्यात गुंड ते एक राजकारणी असा गवळीचा प्रवास दाखवण्यात आलाय. अरुणचा प्रवास दाखवण्यात आल्यामुळे त्यात वयानुसार होणारे बदलही उत्तमरित्या टिपले आहेत. जसे तरुण वयात असताना अरुणचे केस लांब होते तर राजकारणी झाल्यावर केस छोटे ठेवण्यात आले. अर्जुन रामपालचा ‘डॅडी’ बनण्यापर्यंतचा प्रवास इतकाही सोपा नव्हता हे या सिनेमाचा ट्रेलर पाहताना लक्षात येते. ‘डॅडी’ या सिनेमाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसेल.

राजेशने मराठीसोबतच ‘सरकार राज’, ‘मर्डर थ्री’ या हिंदी सिनेमातदेखील कामं केली आहेत. मराठी तसेच हिंदी सिनेमा असो किंवा छोटा पडदा असो ही दोन्ही माध्यमं गाजवलेल्या राजेश याने दोन हॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. हॉलिवूडमधील सिनेमातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.