पुस्तकातून पडद्यावर..

१९६०च्या दशकात ‘फास्टर फेणे’ या कांदबरीच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘फेणे’ या पात्राबद्दलची उत्सुकता सध्याच्या तरुण पिढीमध्ये निर्माण झाली आहे. निमित्त आहे ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाचे. भा. रा. भागवत यांच्या ‘फास्टर फेणे’ या कादंबरीतील गूढता, रहस्य, शोध, उत्सुकता, साहस, शौर्य या चित्रपटात पाहता येणार आहे. ‘फास्टर फेणे’ या आपल्या सुपरहिरोला पुन्हा आत्ताच्या काळात पडद्यावर जिवंत करणारी या चित्रपटाची टीम निर्माता रितेश देशमुख, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, लेखक क्षितिज पटवर्धन, ‘फेणे’ अर्थात अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, पर्ण पेठे आणि ‘झी स्टुडिओ’चे मंगेश कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट दिली. फेणे विषयी भरभरून बोलताना चर्चेचा रोख मराठी चित्रपटांची सद्य:स्थिती या विषयाकडे वळला. आणि चित्रपटगृहांची कमी, पायरसीचे वाढते जाळे, व्यावसायिक निर्मिती संस्थांचा अभाव यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा रंगली.

मराठी चित्रपटांची संख्या वाढली म्हणून ओरड होते. आपल्याकडे ५२ आठवडे आहेत. आपण दर शुक्रवारी चित्रपट का लावतो? तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार मिळून येणाऱ्या तीन दिवसांच्या सुट्टीत प्रेक्षकांना चित्रपट पाहता येतात म्हणून तो पायंडा पडून गेला आहे. दर शुक्रवारी मराठी चित्रपट प्रदर्शित होताहेत. त्यांना हिंदीची स्पर्धा आहे. हॉलीवूड चित्रपटांची स्पर्धा आहे. डिजिटलचं आव्हान आहे आणि टेलिव्हिजनलाही मात देऊन प्रेक्षकांना चित्रपटापर्यंत आणायचं आहे. त्यामुळे ही परिस्थिती मान्य केली तरी मराठी चित्रपटांना मार्केट न मिळण्यामागे अनेक कारणं आहेत. ती एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे मत रितेश देशमुख यांनी मांडले. हिंदीत अभिनेता म्हणून अनुभव असलेला रितेश मराठीत निर्मात्याच्या भूमिकेत आहे. त्याच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ अंतर्गत त्याने आत्तापर्यंत ‘यलो’, ‘बीपी-बालक पालक’ , ‘लय भारी’ असे वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट दिले आहेत. मराठीत फक्त आशयघनच चित्रपट चालतात. अमूक चालत नाहीत, तमूक चालत नाहीत, वगैरे ठोकताळे रितेश उडवून लावतो. माझेच चित्रपट असं म्हणत नाही मी पण गेल्या काही वर्षांत जे मराठीत सुपरहिट चित्रपट ठरलेत म्हणजे साधारणत: मराठी चित्रपट हा १० ते ३० कोटींच्या मध्ये कमाई करतो. पण ‘सैराट’ने ९० कोटी मिळवत वेगळा मापदंड निर्माण केला. ‘लय भारी’ हा तद्दन मसाला चित्रपट होता. ‘कटय़ार काळजात घुसली’ किंवा ‘नटसम्राट’ हे दोन्ही अभिजात नाटकांवर आधारित चित्रपट होते. त्यानंतर ‘टाइमपास’ आणि ‘टाइमपास २’, ‘दुनियादारी’ हे सगळे चित्रपट पाहिले तर प्रत्येकाचा विषय वेगळा होता, मांडणी वेगळी होती. सगळेच आशयघन होते असे नाही. तरीही ते पाहिले गेले. त्यामुळे उत्तम मनोरंजन मूल्य असणारा मराठी चित्रपट पाहिला जातोच. प्रेक्षक चांगला मराठी चित्रपट पाहण्यासाठी तयार आहेत हे त्यातून अधोरेखित होतं. पण आपल्याकडे अजूनही चित्रपटगृहांची संख्या फार कमी आहे. याकडे लक्ष दिले पाहिजे, असं रितेशने सांगितलं.

ग्रामीण भागात मराठी चित्रपटगृहांची संख्या कमी आहे. शहरांमध्ये जिथे चित्रपट दाखवले जातात तिथे तिकिटाचे दर जास्त आहेत. त्यामुळे कुटुंबाला घेऊन चित्रपट पाहणं हे खर्चीक कोम होऊन बसतं. त्यामुळे जिथे निदान ५ हजार लोकसंख्या आहे तिथे एकतरी चित्रपटगृह हे असलंच पाहिजे. पण ते नसल्यामुळे मग पायरेटेड आवृत्ती मोबाइल किंवा सीडी जे मिळेल तसं पाहिलं जातं. किंवा टीव्हीवर येईपर्यंत वाट पाहिली जाते. तेच चित्रपटगृह उपलब्ध झालं तर हा प्रेक्षक मराठी चित्रपटांना मिळेल, असं मत रितेशने व्यक्त केलं. रितेशच्या याच मुद्दय़ाला दुजोरा देत अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी गाव तिथे एसटीस्टंँड असतंच. या एसटीस्टॅंड परिसरात किंवा तिथेच छोटेखानी चित्रपटगृह उभारलं गेलं पाहिजे. जिथे नाटकंही दाखवता येतील. आणि गावात सहजी दोन्ही गोष्टी उपलब्ध होतील, असं मत व्यक्त केलं. चित्रपटगृहांची संख्या कमी असल्याने मग चित्रपट पोहोचवण्यात अडचणी येतात, असं कुलकर्णी यांनी सांगितलं. तर  चित्रपटांची कमाई कमी असल्याने आपला चित्रपट कुठे, कधी प्रदर्शित होतोय, त्यातून किती व्यवसाय होईल हे अंदाज बांधूनच निर्मितीचं गणित ठरवावं लागतं. त्यामुळे निर्माता म्हणूनही मर्यादा येतात, असा अनुभव रितेशने सांगितला. मराठी चित्रपटांची सर्वसाधारण कमाई ही अजूनही १० ते ३० कोटींच्या घरातच आहे. तेव्हा अव्वाच्या सव्वा खर्च करता येत नाही. फास्टर फेणेचंच उदाहरण घ्यायचं तर त्यातली साहसी दृश्ये अधिक तंत्र वापरून आणखी सफाईदार करता आली असती. पण तो खर्च नंतर कमाईतून निघणार नसेल तर मुळात निर्मिती करतानाच बंधनं येणं साहजिक असल्याचं रितेशने यावेळी सांगितलं. एकू णच चित्रपट पाहण्याची संस्कृती अजून विकसित झालेली नाही, पायरसी टाळण्यासाठी यंत्रणा नाही. डिजिटलचा वेग वाढतोय, परिस्थिती बदलतेय यात प्रेक्षकांना चित्रपटांपर्यंत आणणं, त्यातून चित्रपट निर्मिती दर्जेदार करणं हे एकातएक गोष्टी गुंतल्या गेल्या आहेत. त्यावर हळूहळू विचारपूर्वक काम करत नवे मार्ग शोधावे लागतील, असाच निष्कर्ष या चर्चेतून निष्पन्न झाला.

पायरसीचे संकट मोठे

‘फास्टर फेणे’सारख्या रहस्य, गूढ या पठडीतील चित्रपटात काम करण्याची इच्छा होती, मात्र चित्रपटनिर्मितीच्या माध्यमातून माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे. फेणे हे पात्र भागवतांच्या कांदबरीतून वाचकांच्या मनात ठसलेले आहे. कांदबरीत फेणे हे पात्र ११-१२ वयोगटातील आहे. मात्र सध्याच्या तरुणाईशी जोडण्यासाठी, चित्रपटात शौर्य व साहस आणण्यासाठी फेणेची वयोमर्यादा वाढवण्यात आली. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकामधील शोधवृत्तीला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येकामध्ये एक फेणे आहे त्याला जागं करायला हवं. फास्टर फेणेच्या संकल्पनेपासून त्याला चित्रपटात साकार करण्यापर्यंतचा काळ हा जणू गर्भारपणाचा होता. एरवी अभिनेता म्हणून काम करताना तयार संहिता हाती येते. मात्र फास्टर फेणे या चित्रपटनिर्मितीचा दीड वर्षांचा काळ मी, आदित्य व क्षितिजसाठी प्रसूतीच्या काळाएवढा महत्त्वाचा होता.  पायरसीचे मोठे संकट आज चित्रपटसृष्टीसमोर आवासून उभे आहे. ‘मस्ती ३’ या चित्रपटाची पायरसी झाली होती. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रेक्षकांमध्ये गेलो तेव्हा त्यातील अधिकांश जणांनी तो चित्रपट आधीच पाहिला होता. निर्मात्याला याचे मोठे नुकसान सहन करावे लागते. पायरसीने चित्रपट बघणं चुकीचं आहे. सगळे चित्रपट मोबाइलवर पाहिले जातात. पण त्या पाहण्याला काही अर्थ नसतो. चित्रपट हे मोठय़ा पडद्यावरच पाहिले गेले पाहिजेत. तरच तो चित्रपट समजून घेता येतो. पायरसीने मोबाइलवर चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणून आपण प्रगल्भ होत नाही. मराठी चित्रपटांसाठीही वितरण योजना आखणे आवश्यक आहे. प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार केला तर चित्रपटांचे वितरण ८० ते ९० टक्के असेल तर फायद्याचे. याबरोबरच सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटल व्यासपीठाचे आव्हान आहे.

रितेश देशमुख, निर्माता

चित्रपटगृहांची संख्या वाढणे गरजेचे

मराठी चित्रपट कात टाकत आहे. त्यामुळे  मराठी चित्रपटसृष्टीतील समस्या सोडविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. पायरसी, स्पर्धा या नेहमीच्या कारणांबरोबरच अजूनही आपल्याकडे चित्रपट हा संस्कृतीचा भाग होऊ शकलेला नाही. त्यामागे चित्रपटगृहांची कमतरता हे महत्त्वाचे कारण आहे. जोपर्यंत चित्रपटगृहांची संख्या वाढत नाही तोपर्यंत चित्रपट सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग होऊ शकत नाही. परिणामी मराठी चित्रपटांच्या व्यवसायाला अपेक्षित उंची गाठता आली नाही.

गिरीश कुलकर्णी

हा फास्टर फेणे या पिढीचा..

लहान असताना फास्टर फेणेबद्दल वेगळीच क्रेझ होती. तेव्हापासून आपला आवडता बालमित्र म्हणून त्याची छबी मनात खोलवर रुतली होती. त्यानंतर चित्रपटात क्षेत्रात काम करताना बालसाहित्य मागे पडत गेले आणि वाचनाला वेगळी दिशा मिळाली. मात्र चित्रपटाच्या निमित्ताने फास्टर फेणेचा विषय पुन्हा डोक्यात घोळायला लागला व वेगळ्या धाटणीचा चित्रपट करण्याच्या हेतूने आम्ही फास्टर फेणेकडे वळलो. परदेशामध्ये बालसाहित्यातून चित्रपट किंवा मालिकांच्या माध्यमातून उभे राहिलेली अनेक पात्रे आहेत. मराठीमध्ये असाच हिरो निर्माण करायचा म्हणजे तो मराठी मातीतला असायला हवा. फास्टर फेणेला नव्या पिढीसमोर आणण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करीत असताना तो आताच्या पिढीच्या जवळ जाईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. फेणेभोवती नवा आशय तयार करण्यात आला. चित्रपटनिर्मिती करण्यापूर्वी भागवतांनी लिहिलेल्या फेणे या पात्राचा अभ्यास करण्यात आला. त्यांची फेणे लिहिण्यामागची कल्पना, प्रेरणा समजून घेण्यात आली. यासाठी भागवतांच्या मुलाशी संपर्क करून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अंधश्रद्धा किंवा जादू या बाबी चित्रपटात दाखविण्यात आलेल्या नाहीत.

आदित्य सरपोतदार, दिग्दर्शक

मुलांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न

‘साहस’ या एकमेव भावनेतून फास्टर फेणे साकारण्यात आला. फास्टर फेणे हे पात्र व त्याच्या कथा या भा. रा. भागवत यांच्या कांदबरीतून प्रस्थापित झाले असल्याने यावर चित्रपट साकारणारे आव्हानात्मक होते. फास्टर फेणे हा चित्रपट १८ ते १९ या वयोगटाला समोर ठेवून तयार करण्यात आला आहे. आपण नवीन प्रेक्षक शोधायला हवेत. १८-१९ वर्षांची मुले मराठी चित्रपट बघणारा वर्ग आहे. या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट तयार केला तर त्या मुलांनाही मराठी चित्रपटाबद्दल ओढ निर्माण होईल. या चित्रपटाची संहिता लिहिण्यापूर्वी १८ ते २१ वयोगटातील मुलांसोबत चर्चा केली होती. या चर्चेतून मुलांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला. फास्टर फेणे हादेखील आताच्या काळातील आहे हे या मुलांसोबत चर्चा करताना लक्षात आले. या चित्रपटाच्या संहितेसाठी मुलांचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशी बोलताना फेणे हादेखील याच काळातील आहे हे लक्षात आले.

क्षितिज पटवर्धन, लेखक

फेणे फक्त बोलत नाही, तो कृती करतो

फास्टर फेणे हा काही दशकांपूर्वीच्या लहान मुलांचा हिरो होता. आताच्या पिढीमध्ये ज्यांनी फास्टर फेणेची पुस्तके वाचली नाहीत, त्यांच्या मनात हा हिरो रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. फेणेच्या पात्राशी जुळविण्यासाठी खूप प्रयत्न केले. चित्रपटासाठी १० ते १२ किलो वजन कमी केले. साहसी दृश्यांचा सराव केला. पण फेणे फक्त चित्रपटात साकारून उपयोग नाही, तो जपता यायला हवा. हा बदल अंतर्बाह्य़ व्हावा यासाठी प्रयत्न केला. समाजमाध्यमांवर एखाद्या विषयावर व्यक्त होणे म्हणजे समाजाचे भान जपणे हा गैरसमज समाजात वाढत चालला आहे. फेणे हे पात्र त्यापुढे जाऊन पाऊल उचलणारं आहे. तो फक्त व्यक्त होऊन थांबत नाही, तर त्यावर कृती करतो. तो अन्यायाच्या मुळाशी जाऊन शोध घेणारा आहे. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की मला या भूमिकेसाठी अंतर्बाह्य़ बदलण्याची संधी मिळेल. ही संधी मला फास्टर फेणेच्या निमित्ताने मिळाली.

अमेय वाघ

विजेत्या टीमचा घटक असण्यात आनंद 

‘फास्टर फेणे’ या चित्रपटात अंबादास ही भूमिका करतो आहे. रितेश देशमुख यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. रितेशला स्वत:ला अंबादास साकारायची इच्छा होती. मात्र त्यासाठी माझी निवड झाली याचा आनंद आहे. अंबादास ही व्यक्तिरेखा फेणेच्या प्रवासात त्याला मदत करते. या चित्रपटाच्यानिमित्ताने अनेक गोष्टी शिकता आल्या. ही भूमिका म्हणजे ‘फास्टर फेणे’सारख्या वेगळ्या, मोठय़ा विजेत्या चित्रपटाचा भाग होण्याचा आनंद आहे.

सिद्धार्थ जाधव, अभिनेता

समाजमाध्यमांवर प्रश्न सुटत नाही

या चित्रपटात मी अबोली नावाची भूमिका करते आहे. समाजमाध्यमांवर व्यक्त होऊन प्रश्न किंवा समस्या सुटत नाहीत. मुळातच माझी शोधवृत्ती असल्याने चित्रपटातील पत्रकाराची भूमिका करणे सोपे झाले. पत्रकाराच्या तयारीसाठी लेखकासोबत चर्चा करून पत्रकार कसा विचार करतो याबद्दल जाणून घेतले.

पर्ण पेठे, अभिनेत्री

पुढे जाऊन डिजिटलवर चित्रपट विक्री

चित्रपटातील कथानकाची आवश्यकता, प्रेक्षकांवर पडणारा प्रभाव या सर्व बाबींवर चित्रपटांचे मूल्यांकन केले जाते. चित्रपटाचे मूळ सूत्र काळानुरूप असायला हवे. त्यामुळे चित्रपटाचे वितरण करताना पहिला विचार चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांपासून होतो. सध्या डिजिटल युगात चित्रपटांचे माध्यम बदलत आहे. पुढे जाऊन डिजिटल व्यासपीठावरही चित्रपट विकला गेला तर आपण त्याचे आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नाही.

मंगेश कुलकर्णी, व्यवसाय प्रमुख, झी स्टुडिओ

संकलन: मीनल गांगुर्डे, छाया: अमीत चक्रवर्ती, विघ्नेश कृष्णमूर्ती