छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त ‘बिग बॉस १०’ या कार्यक्रमामुळे सलमान खान अडचणीत येण्याचे संकेत आहेत. बिग बॉसच्या घरातून अश्लिलतेचा प्रसार होत असल्याचे सांगत या कार्यक्रमाच्या आयोजकांसह सलमान आणि बिगबॉसमधून बाहेर काढण्यात आलेल्या ओम स्वामी यांच्याविरोधात बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील बरेलीच्या एका वकिलाने ‘बिग बॉस १०’ या वादग्रस्त कार्यक्रमावर आक्षेप नोंदविला आहे. अनिल द्विवेदी नावाच्या वकिलाने सलमान खान, कलर्स टीव्ही चे कार्यकारी अधिकारी आणि ओम स्वामी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या कार्यक्रमातून अश्लिलतेला प्रोत्साहन दिले जात असून हिंदू धर्मियांच्या भावना देखील दुखावल्या जात असल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटल्याचे समजते. बिग बॉसच्या घरात विकृत कृत्य केल्यानंतर घर सोडावे लागलेल्या ओम स्वामी यांच्या पोशाखावर आक्षेप नोंदविला आहे. या कार्यक्रमामध्ये ओम स्वामी भगव्या वस्रामध्ये दिसले होते. संत महात्म्यांच्या वेशात स्वामी यांनी विकृत भाषा आणि मांसाहारी अन्न खाऊन हिंदू धर्माच्या भावाना दुखावल्या असल्याचा उल्लेख  तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.  तक्रारदार वकिल द्विवेदी यांनी या तिघांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात  १३ फेब्रुवारीला या तक्रारीवर सुनावणी करण्यात येणार आहे.

बिग बॉसच्या घरात आपल्या विकृत अंदाजाने लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ओम स्वामी यांना बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखविला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी सलमानसह बिग बॉसमधील सहकाऱ्यांवर उलट सुलट बोलण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांपर्वीच सलमानला कानशिलात मारल्याचे देखील स्वामींनी म्हटले होते. अर्थातच लोकप्रियता मिळविण्यासाठी काही करु शकतो, अशा अविर्भावात ओम स्वामी प्रसारमाध्यमांना मुलाखती देताना दिसले होते. ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाचा टीआरपी कमी झाल्यामुळे आयोजकांसह सलमान खान शोमध्ये पुन्हा बोलवत असल्याचा दावाही ओम स्वामी यांनी केला होता. हे सांगताना सलमानने नाक घासून माफी मागितली तरच कार्यक्रमात परत जाईन, असेही ते म्हणाले होते. दरम्यान सध्या बिग बॉसचे आयोजक ओम स्वामी यांना ‘बिग बॉस १०’ च्या महा अंतिम सोहळ्यात पुन्हा बोलविण्याचा विचार करत असल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. यासंदर्भात बिग बॉसच्या आयोजकांकडून अथवा सलमानकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.