ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांच्या संगीत रजनीचे चित्रीकरण सुरू असल्याचे लक्षात येताच आशाताईंनी कार्यक्रम थांबवला आणि त्या व्यासपीठावरून तडक निघून गेल्याची घटना िपपरीत सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात रविवारी घडली. या मुद्दय़ावरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनीच माफी मागून पडदा टाकला.
साहित्य महामंडळ व आयोजक संस्थेत ‘संवाद’ नसल्यामुळे साहित्य संमेलनातील संगीत रजनीच्या कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले. आशाताईंनी दूरचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींना चित्रीकरण करण्यास मनाई केली आणि त्या गाणे थांबवून व्यासपीठावरून निघून गेल्या. मात्र, चित्रीकरण थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा कार्यक्रम सुरूही केला. आयोजकांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याने प्रकरण वाढले, तेव्हा खुद्द आशा भोसले व संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी पत्रकारांची माफी मागितल्याने वादावर पडदा पडला. साहित्य संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेला हा कार्यक्रम साडेसातच्या सुमारास सुरू झाला. कार्यक्रम रंगात येऊ लागला असतानाच काहीजण चित्रीकरण करत असल्याचे आशाताईंच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी गाणे थांबवले. निवेदक सुधीर गाडगीळ यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या संयोजकांच्या प्रतिनिधींना त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली व त्या व्यासपीठ सोडून निघून गेल्या. जोपर्यंत चित्रीकरण थांबणार नाही, तोपर्यंत आपण गाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नेमके काय घडले, याची रसिकांना कल्पना नव्हती. ते चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडून होत असल्याचे नंतर लक्षात आले. गाडगीळ यांनी चित्रीकरण न करण्याची विनंती माध्यमांच्या प्रतिनिधींना केली. कार्यक्रम थांबल्याने रसिकांमध्ये नाराजी निर्माण झाली. काही प्रमाणात गोंधळही सुरू झाला. चित्रीकरण थांबल्याचे सांगण्यात आल्यानंतर आशा भोसले पुन्हा व्यासपीठावर आल्या व त्यांनी गाण्याचा कार्यक्रम पुढे सुरू केला. या दरम्यान खासगी सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली, तेव्हा पत्रकारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. तथापि, कार्यक्रम संपल्यानंतर आशा भोसले व स्वागताध्यक्ष डॉ. पाटील यांनी झाल्या प्रकाराची माफी मागितली. ‘अरे मित्रांनो मी ८३ वर्षांची आहे. आता मी कोणावर रागावून काय करू’ या शब्दात आशाताईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर, रसिक प्रेक्षकांनी गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला.