गेली सहा वर्षे आशुतोष गोवारीकर हे नाव ‘मोहेंजो दारो’ या एकाच चित्रपटाशी जोडलेलं आहे. त्याचे समकालीन जिथे वर्षां-दोन वर्षांच्या अंतराने एकेक चित्रपट काढण्यात मग्न आहेत तिथे त्याचं असं एकाच चित्रपटात अडकून पडणं कोडय़ात टाकणारं आहे. हल्ली तर आशुतोष गोवारीकर या नावामागे दिग्दर्शकाच्या आधी इतिहास संशोधक असं पद गमतीने जोडलं जातं. या सगळ्याकडे फार अलिप्ततेने पाहण्याची कला जणू आशुतोषने कमावली असावी.. इतक्या सहजतेने ‘लगान’ ते ‘जोधा अकबर’पर्यंतच्या प्रवासात प्रत्येक चित्रकृती सादर करताना त्यामागचं संशोधन, अभ्यास हा दिग्दर्शक म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचा होता आणि संशोधन करत नवा चित्रपट हा प्रवास जबाबदारीने सुरू असल्याचं तो जबरदस्त विश्वासाने सांगतो. ‘मोहेंजो दारो’च्या आधीही आशुतोषने ‘बुद्धा’ या चित्रपटावर काम सुरू केलं होतं. हा चित्रपट सध्या काही कारणांनी मागे पडला असला तरी आशुतोषचा जीव अजूनही त्यात अडकून पडला आहे आणि संधी मिळाली तर हा चित्रपट पूर्ण करण्याचा त्याचा ध्यास आहे.
‘मोहेंजा दारो’साठी संशोधनात साडेतीन र्वष गेली. त्यानंतर या चित्रपटात नायक म्हणून हृतिक रोशनच हवा असल्याने त्याच्यासाठीही तीन र्वष वाट पाहिल्यानंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर पूर्व-इतिहासकालीन, आत्तापर्यंत केवळ इतिहासाच्या पुस्तकातील एखाद्याच धडय़ात हरवून बसलेल्या सिंधू-संस्कृतीची कथा सांगण्यासाठी सज्ज झाला आहे. म्युझियममध्ये गेल्यानंतर सिंधू संस्कृतीचे सापडलेले अवशेष, तेव्हाची भांडी-वस्तू बघताना थक्क व्हायला झालं. काय असतील ही लोकं? त्या वेळची त्यांची संस्कृती कशी असेल? असे प्रश्न तेव्हा मनात उमटले होते. त्यानंतर जेव्हा ‘लगान’साठी भुजमध्ये लोकेशन रेकी करायला गेलो तेव्हा तिथे ‘धोलावीरा’ शहर बघितलं. त्या वेळी मोहेंजो दारोची आठवण ताजी झाली, असं तो म्हणतो. हडप्पा संस्कृ तीच्या खाणाखुणा अंगावर घेऊन वावरणाऱ्या या शहरातून खूप वेळ फिरल्यानंतर त्या सगळ्या शहरांमध्ये असलेला एक समान धागा जाणवला. तिथले रस्ते, घरांची रचना बघितल्यानंतर थक्क झालेल्या मनाने संधी मिळाली तर चित्रपट करायचा हे ठरवून टाकलं होतं, असं त्याने सांगितलं.
आपण ग्रीक, रोमन , इजिप्शियन संस्कृती बघतो. पण आपली संस्कृती बाहेरच्यांनाच काय आपल्यालाही माहिती नाही. आपण केवळ पुस्तकातूनच वाचतो. हा सगळा विषय सात-आठ र्वष मनात घोळत होता, असं सांगणाऱ्या आशुतोषने चित्रपट म्हणून हे सगळं पडद्यावर आणणं भलतंच अवघड होतं हेही कबूल केलं. ‘पूर्व-इतिहासकालीन म्हणजे काय? तर त्या काळाविषयी आपल्याकडे लिखित स्वरूपात काहीही नाही. कुठलेही संदर्भ नाहीत. उत्खननातून पुरातत्त्व अभ्यासकांना सापडलेले अवशेष, काही ठिकाणी सापडलेले दगडांचे दागिने, फुटलेली मातीची भांडी आणि ही ओसाड पडलेली नुसत्या विटांची शहरं.. एवढीच माहिती आज आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा पुरातत्त्व अभ्यासकांशी संपर्क केला. जॉनेथन मार्क कॅनर हे अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात मानववंशशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना या चित्रपटाची कल्पना दिली. तेव्हा त्यांनी तू नक्की कर, असा सल्ला दिला; पण मी चित्रपट कसा करणार, याचं त्यांनाही नवल वाटत होतं. त्याचं कारण म्हणजे पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे त्यांना समजा मडक्याचे तुकडे मिळाले तर ते हे एके काळी मडकं होतं एवढचं आम्ही सांगू शकतो. पण ते कोणी वापरलं, कशासाठी वापरलं, हे सांगणं आमचं काम नाही, असं ते म्हणतात. मग मी त्यांना म्हटलं की, तुम्ही मला वस्तुस्थिती समजावून सांगा, त्याला कल्पनेत बांधायचं काम मी करतो. एकदा सत्य आणि कल्पित कथेची गुंफण झाल्यानंतर ती पुन्हा त्यांच्याचकडून वाचून घ्यायची. त्यात कुठल्या चुका आहेत ते जाणून घेऊन दुरुस्ती करून घ्यायची, अशा पद्धतीने या चित्रपटाची मोर्चेबांधणी केल्याचं आशुतोषने सांगितलं.
मुळात ज्या इतिहासाची कथाच नाही, तिथल्या माणसांची कुठलीच गोष्ट माहिती नाही, अशा वेळी नुसत्या अवशेषांमधून कहाणी रचण्याचं हे आव्हान त्याने दिग्दर्शक म्हणून कसं पेललं असेल, असा प्रश्न पडतो. त्यासाठी त्या काळी सापडलेल्या छोटय़ा-छोटय़ा मुद्रांचा उपयोग झाल्याचं त्यानं सांगितलं. ‘‘एका मुद्रेवर ढोल वाजवणारी व्यक्ती दिसते त्यावरून मी एक व्यक्तिरेखा बांधली. एका नाचणाऱ्या मुलीचा ब्राँझ पुतळा आहे त्यावरून मी तिची व्यक्तिरेखा तयार केली. मुद्रांवर असलेल्या चित्रांमध्ये ज्या प्रकारचे लोक दिसत होते ते एकेक उचलून मी माझ्या गोष्टीतील व्यक्तिरेखा तयार केली. ही प्रक्रिया अवघड होती, पण अत्यंत वेगळा अनुभव देणारी होती,’’ असं तो म्हणतो. याचं कारण लोकांना या चित्रपटात सिंधू संस्कृती पाहण्यात रस असेल, ती दाखवली. तिथल्या लोकांचे कपडे हे असे आहेत ते दाखवलं, पण शेवटी या सगळ्या गोष्टी कथेच्या बॅकग्राऊंडला जाणाऱ्या आहेत. मुळात चित्रपटात कथाच नसेल तर तुम्ही काय पाहणार? त्यामुळे कथा जास्त महत्त्वाची.. असं त्याने सांगितलं.
या चित्रपटाच्या कथेचा पसारा जास्त असल्याने कच्छमध्ये भुजच्या जवळ जिथे ‘लगान’चं चित्रीकरण केलं होतं तिथे २५ एकर जमीन घेऊन सेट बांधला, अशी माहिती आशुतोषने दिली. चित्रपटाचं नाव ‘मोहेंजो दारो’ असल्याने सेटमधून ते शहर दिसणं ही गरज होती. त्यामुळे ऐंशी टक्के सेटचं वास्तव चित्रण आणि वीस टक्के व्हीएफएक्सचा वापर करून हे शहर उभं केलं असल्याचं तो म्हणाला. कथेचा विचार करतानाही ते देव मानत होते की नाही, पाण्याला देव मानत होते की भूमातेला देव मानत होते, त्या वेळचं राजकारण-समाजकारण कसं असेल. या सगळ्यांच्या जोडीने त्यांची भाषा ही गोष्ट महत्त्वाची होती. ‘‘सिंधू संस्कृतीची नेमकी भाषा कोणती हे अजूनही अभ्यासकांनी उघड केलेले नाही. त्यावर संशोधन सुरू आहे. प्राकृतच्या जवळची भाषा ते बोलत असावेत, असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे, तर काहींच्या मते त्यांची भाषा ब्राह्मी आहे. यावर अजून संशोधकांचे एकमत नाही. त्यामुळे हा चित्रपट करताना प्रामुख्याने हिंदी भाषाच आहे, पण त्यात काही वेगळ्या शब्दांचा जाणूनबुजून वापर करण्यात आला आहे. या चित्रपटात एक गाणं आहे ‘लख लख थोरा..’ म्हणून. ‘लख लख’ या शब्दाचा अर्थ आभार असा होतो, पण ते सहजपणे कोणाला माहिती नाही. असे काही शब्द मिक्स करून या चित्रपटासाठी वेगळी भाषा तयार केली आहे.’’
ए. आर. रेहमानच्या गाण्यांमधून चित्रपटाच्या कथेला साजेसा ताल, बाज निर्माण करण्यात आला आहे. त्याविषयी बोलताना आपण जेव्हा चित्रपटासाठी म्हणून काही एक संशोधन करतो तेव्हा तो अभ्यास टीममधील प्रत्येकाला दिला जातो, असं त्याचं म्हणणं आहे. ‘मोहेंजो दारो’ची संस्कृती विकसित झाली तो काळ म्हणजे अश्मयुगानंतरचा, पण लोहयुगाच्या आधीचा काळ आहे. म्हणजे लोखंडाचा शोधच लागलेला नव्हता तेव्हा.. मग त्या वेळी जे आवाज असतील ते कशा प्रकारचे असतील? त्यांची वाद्ये कुठली असतील? याचा विचार करून त्या काळच्या संगीताची कल्पना आपल्याला करावी लागते. त्यांचे राहणीमान-बोलण्या-वागण्याच्या पद्धती यांचाही संगीतावर परिणाम होत असतो. या सगळ्या अभ्यासावर रेहमानबरोबर चर्चा झाली होती. रेहमान मुळात असा संगीतकार आहे, की त्याला जेवढी जास्त माहिती द्याल, तो ती घेतो आणि आपल्या संगीताच्या अभ्यासात उतरवून एक वेगळाच ध्वनी निर्माण करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावर आम्ही चर्चा केली होती ते म्हणजे त्या संस्कृतीत देव कोण आहे हेच माहिती नाही. त्यामुळे तिथे मंदिराचा, मशिदीचा, चर्चचा किंवा गुरुद्वारेचा असा कोणताही आवाज नको होता. एक वेगळा असा ध्वनी ‘सिंधू माँ’साठी तयार करायचा होता आणि तुम्ही जर गाणी ऐकलीत तर रेहमानने त्या पद्धतीने सिंधू संस्कृतीसाठी म्हणून वेगळं असं भव्य संगीत तयार केलं आहे, असं तो म्हणतो.

‘दिग्दर्शकाने हवं तेवढं अभिव्यक्तिस्वातंत्र्य घ्यावं’
चित्रपट हे काल्पनिक माध्यम आहे. ते काही इतिहासाचं पुस्तक नाही. मी जेव्हा ‘जोधा अकबर’सारखा ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतो तेव्हा मी ‘मुघल-ए-आझम’चा अभ्यास करत नाही. त्या वेळी मी ‘अकबरनामा’ वाचेन, राजपूतांचा इतिहास वाचेन आणि त्या अभ्यासावर मी माझा चित्रपट तयार करेन; पण तो पाहिल्यानंतर जर कोणी एखादी गोष्ट अशी घडलीच नाही, असा आक्षेप घेतला तर तो खरा असू शकतो, कारण इतिहास अभ्यासकांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. तुम्हाला जे आवडेल त्यावर तुम्ही चित्रपट करा. मी मला जे आवडतं , पटतं त्यावर चित्रपट करतो. दिग्दर्शकाने जितकं अभिव्यक्तिस्वातंत्र्य घेता येईल तेवढं घ्यावं. दोन इतिहास संशोधक – पुरातत्त्व अभ्यासकांमध्ये एकमत नसतं. त्यांच्यातच वाद आहेत. त्यामुळे तुम्ही कोणा एका अभ्यासकावर विश्वास ठेवा, तुमचं संशोधन करा आणि अभ्यासाअंती तुमचा ज्यावर विश्वास बसेल त्यावर ठाम राहून चित्रपट करा.  आशुतोष गोवारीकर

‘बुद्धा’त अडकला जीव!
‘खेले हम जी जान से’ हा चित्रपट करत असतानाच आशुतोषने ‘बुद्धा’वर काम सुरू केले होते. दीड वर्ष संशोधन केल्यानंतर काही अपरिहार्य कारणाने तो चित्रपट मागे पडला. दिग्दर्शक म्हणून ब्रिटिशकालीन भारत, ‘जोधा अकबर’च्या निमित्ताने मध्ययुगीन काळ आणि आता ‘मोहेंजो दारो’साठी अर्वाचीन काळात फिरून आलेल्या आशुतोषचा जीव बुद्धाच्याच काळात अडकला आहे. बुद्धाचा काळ हा खऱ्या अर्थाने प्राचीन काळ आहे. त्या काळाने मला आश्चर्यचकित केलं आहे. बुद्धाचा महाजनपदाचा जो काळ आहे तो खूप वेगळा आहे. लोहयुगानंतरचा हा काळ आहे आणि तोवर मोठमोठी संशोधनंही एकीकडे झालेली आहेत. त्या वेळच्या कथा या अभिजात आहेत. मंत्रमुग्ध करणाऱ्या या काळावर संधी मिळाली तर चित्रपट करणारच, असं तो ठामपणे सांगतो.