२०१७ या वर्षाच्या सुरुवातीपासून महिलांवर होणारे अत्याचार आणि विनयभंगांच्या बातम्या वारंवार नजरेस पडत आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग आणि छेडछाड यांसारख्या दुष्कृत्यांना चाप बसण्याची तीव्र गरज अनेकांनीच व्यक्त केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यामुळे सध्या प्रत्येकजण स्वत:च्या परिने यामध्ये आपली भूमिका बजावत आहे. काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे घडलेल्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तरुणीच्या छेडछाडीची घटना घडली आहे. सध्या या घटनेने अनेकांचेच लक्ष वेधले आहे.

शनिवारी रात्री पाकिस्तानातील कराची येथे पार पडलेल्या गाण्याच्या कार्यक्रमादरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्रसिद्ध गायक आतिफ अस्लम गाण्यासाठी व्यासपीठावर असतानाच अचानक त्याने गाणे आणि वाद्यवृंद थांबविले. त्यावेळी काही क्षणांसाठी तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना काही कळेनासेच झाले होते. पण, लगेचच हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला. त्या गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये एक माणूस पुढील रांगेत असलेल्या मुलीकडे घाणेरड्या नजरेने पाहात होता, तिची छेड काढत होता. त्याचक्षणी आतिफने चालू असलेला कार्यक्रम थांबवत त्या मुलीची मदत केली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चे आहे. ट्विटर आणि फेसबुकवर आतिफच्या या व्हिडिओला नेटिझन्सनी शेअर केले असून त्याच्या या कृतीबद्दल त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की गाण्याचा कार्यक्रम सुरु असतानाच आतिफ त्या इसमाला म्हणतोय की, ‘तू कधी मुलगी नाही पाहिली आहेस का? तुझी आई किंवा बहिणही असू शकते इथे’. आतिफच्या या प्रश्नानंतर तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी त्याच्याच नावाचा कल्ला सुरु केला. आतिफने लगेचच त्याच्या अंगरक्षकांना बोलावून त्या मुलीची तेथून सुखरुप सुटका केली. सध्या आतिफ अस्लमच्याच नावाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत.