मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटानंतर आता बॉलीवूडमध्येही अशाच शीर्षकाचा चित्रपट येणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा मराठी चित्रपटाचा रिमेक असेल, तर असे नाहीये. हिट तमिळ विनोदी चित्रपट ‘कल्याण समयाल साधम’ याचा हा रिमेक आहे. ‘दम लगा के हायशा’ या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. ‘शुभ मंगल सावधान’ या हिंदी चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा तुम्हाला एकत्र पाहावयास मिळेल.

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दम लगा के हायशा’ चित्रपटात आयुष्यमान आणि भूमीच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. रुपेरी पडद्यावर त्यांच्या केमिस्ट्रीची चित्रपट समीक्षकांनीही प्रशंसा केली होती. त्यानंतर आता लवकरच ही जोडी पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांच्या ‘कलर यल्लो प्रॉडक्शन’ अंतर्गत करण्यात येणार आहे.  याचे दिग्दर्शन आर. एस प्रसन्ना करणार असून याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. नुकताच आयुष्यमान आणि भूमीचा ‘शुभ मंगल सावधान’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. या फोटोत आयुष्यमानने पांढ-या रंगाची ट्राउजर आणि निळ्या रंगाचे टीशर्ट परिधान केलेले दिसते. तर भूमीने सुंदर असा निळ्या रंगाचा प्रिन्टेड कुर्ता परिधान केलेला दिसतो.

आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांचा ‘शुभ मंगल सावधान’ हा एकत्र तिसरा चित्रपट असेल. ‘दम लगा के हायशा’ नंतर या दोघांनी गेल्या वर्षी ‘मनमर्झिया’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट प्रसिद्धीत आलाच नाही.