नव्या बाहुबली भक्तांनी चित्रपटगृहे गजबजली

बाहुबली-२ चित्रपटांच्या ट्रेलर्समुळे गेला महिनाभर उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या देशभरातील प्रेक्षकांनी शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशी सर्वच चित्रपटगृहांवर तिकिटांसाठी रांगा लावल्या. भरपूर कालावधीनंतर पहिल्याच दिवशी तिकीटबारीवरील पाटय़ांवर  ‘हाऊसफुल्ल’ अक्षरांची देशभर सारखीच पुनरावृत्ती होती.  ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ने पहिल्या दिवशी ७० ते ८० कोटी रुपयांच्या आसपास कमाई करून नवा इतिहास रचला असल्याचे चित्रपट व्यवसायतज्ज्ञांचे मत आहे. जगभरातून ९ हजार चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झालेला हा चित्रपट १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जगभरात या चित्रपटाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी ८० कोटी रुपयांचा आकडा पार करेल, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे. देशभरातून जे आकडे येत आहेत ते पाहता हा चित्रपट ‘गेम चेंजर’ ठरेल. चित्रपटगृहांसमोर लोकांच्या रांगा उसळल्या असून ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड परतले, अशा शब्दांत ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी पहिल्या दिवशी चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाचे वर्णन केले आहे. या चित्रपटासाठी ‘बुक माय शो’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विक्रमी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले होतेच, मात्र आता ३.३ दशलक्ष एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तिकीट विक्री हा आपल्यासाठीच विक्रम असल्याचे ‘बुक माय शो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष सक्सेना यांनी सांगितले.

देशभर धमाका

‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटासाठी मुंबई, दिल्ली, गुजरातमध्ये सोमवारपासूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते. तर हैदराबाद, चेन्नईमध्ये गेल्या शुक्रवारपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी ऑनलाइन बुकिंग्ज हाऊसफुल्ल झाले होते. त्यामुळे या चित्रपटाला देशभरात पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी होणार हा चित्रपटगृह व्यावसायिकांचा होरा खरा ठरला. २५० कोटी रुपयांच्या अवाढव्य बजेटमध्ये बनवलेल्या या सिक्वलपटाचे मुंबईसह ठिकठिकाणचे शोज हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहेत.  सोमवापर्यंत लोकांना सुट्टय़ा आहेत आणि चित्रपटगृहावर ‘बाहुबली २’ वगळता अन्य कुठलाही चित्रपट प्रदर्शित झालेला नसल्याने सगळीकडे केवळ याच चित्रपटाचे शो सुरू आहेत.