दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘बाहुबली २’ या चित्रपटाची बॉक्सऑफिसवर विक्रमी घोडदौड सुरु आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करेल, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरताना दिसतोय. ‘बाहुबली २’ या चित्रपटाची विक्रमी कमाई सुरु आहे, असे ट्विट चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केले आहे. भारतासह परदेशातही चित्रपट दमदार कमाई करत असल्याचे सांगत अमेरिकेत हा चित्रपट ऐतिहासिक कमाईच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत या चित्रपटाने आतापर्यंत ७० लाख डॉलर इतकी कमाई केली आहे. न्यूझीलंडमध्ये बाहुबलीने पहिल्याच दिवशी मागील वर्षी परदेशात विक्रमी कमाई करणाऱ्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाला मागे टाकले. या ठिकाणी ‘बाहुबली २’ हिंदी व्हर्जनने शुक्रवारी ८४ हजार ७८२ डॉलर इतकी कमाई केली. तर शनिवारी हा आकडा आणखी वाढल्याचे दिसले.

ऑस्ट्रेलियात देखील बाहुबलीचे वारे वाहताना दिसत आहेत. या ठिकाणी ‘बाहुबली २’ च्या हिंदी व्हर्जनने शुक्रवारी आणि शनिवारी तब्बल २.५९ कोटी अशी दमदार कमाई केली. बाहुबलीच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईने बॉलिवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरही आनंदीत झाला आहे. त्याने बाहुबली पहिल्या चित्रपटाप्रमाणेच दमदार प्रवास करत असल्याचे म्हटले आहे. ‘बाहुबली २’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन त्याने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईबद्दल समाधान व्यक्त केले.

‘बाहुबली २’ या बहुचर्चित चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी अनेक विक्रम नोंदविण्यास सुरुवात केली होती. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाने डिजिटल अधिकार विक्रीतून ५०० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर चित्रपटाने तिकीट विक्रीचा विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी या चित्रपटाची १० लाख तिकिटे बुक झाल्याचा दावा ‘बुक माय शो’ने केला होता. यामध्ये प्रत्येक सेकंदाला तब्बल १२ तिकिटांची विक्री झाली होती. तसेच पहिल्या दिवशी १०० कोटींची कमाई करत या चित्रपटाने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत आणि बॉलिवूडमधील सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटाला मागे टाकले.