दिग्दर्शक एसएस राजामौली आणि निर्माता शोबू यार्लागड्डा सध्या परमोच्च आनंदाची अनुभूती घेत असतील. त्यांची अफाट मेहनत आणि ‘बाहुबली’ सिनेमासाठी समर्पित भावना याचं चीज होताना ते आज बघताहेत. प्रभास आणि राणा डग्गुबती यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. पण याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘बाहुबली २’ या सिनेमाने फक्त भारतातच १००० कोटींहून अधिक कमाई केलीये.

तुमचा विश्वास बसत नाहीये का? पण हे खरंय… जगभरातली कमाई तर जाऊच द्या, या सिनेमाने फक्त भारतातच १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषांमधील ‘बाहुबली २’ सिनेमाची कमाई एकत्र केली तर हा आकडा १००० कोटींहून अधिक होतो.

व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात अधिक माहिती दिली. २८ एप्रिलला हा सिनेमा संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला होता. सिनेमा प्रदर्शित होऊन अजून महिनाही उलटला नसताना या सिनेमाने कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. दोन भागात बनलेल्या या सिनेमात प्रभास आणि राणा डग्गुबतीसोबत रम्या कृष्णन, अनुष्का शेट्टी, सत्यराज, तमन्ना भाटिया आणि नसर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

विराट-अनुष्कासोबत टीम इंडियाने पाहिला ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’

राजामौली हे ‘बाहुबली’ सिनेमा आता टिव्ही सीरिज स्वरुपात काढण्याचा विचार करत आहेत. पण इतर सर्वसामान्य मालिकांप्रमाणे याचे चित्रण होणार नसल्यामुळे प्रत्येक सिझनमध्ये १० ते १५ भाग याप्रमाणे सीरिज स्वरुपात ‘बाहुबली’वरील मालिका काढावी लागेल, असेही त्यांनी म्हटलंय. निर्माता शोबू यांनी या वृत्ताला दुजोरा देत सर्वात आधी हिंदी भाषेत या टिव्ही सीरिजची निर्मिती करणार असल्याचे सांगितलेय. त्यामुळे आता लवकरच ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या अमेरिकन टिव्ही सीरिजप्रमाणेच राजामौली आणि शोबू काहीतरी भव्य असे प्रेक्षकांसाठी घेऊन येतील, अशी अपेक्षा केली जातेय.