एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली-२’ हा बहुचर्चित सिनेमा येत्या २८ एप्रिल रोजी रिलिज होतो आहे. या सिनेमाची दाक्षिणात्य राज्यांत किती क्रेझ आहे हे काही नव्याने सांगायला नको. या सिनेमाशी निगडीत अनेक बातम्या दररोज येत असतात. पण जसजशी प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय तसे निर्मात्यांच्या संकटातही वाढ होत आहे. सुरूवातीला सिनेमातला एक सीन लीक झाला होता. पण आता प्रदर्शनापूर्वी ‘बाहुबली २’चे तेलगु व्हर्जनही लीक झाले आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सिनेमाच्या तिकिटांचे अॅडव्हान्स बुकींग जोरात सुरू आहे. दाक्षिणात्य राज्यांत पहिल्या आठवड्यातले सगळे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. तिकीट बारीवर तिकीट मिळवण्यासाठी सिनेरसिक तासंनतास रांग लावताना पाहायला मिळत आहे. बाहुबलीच्या तिकीटांची किंमत ऐकूनही तुम्हाला नक्कीच धक्का बसेल काही भागात ‘बाहुबली २’च्या एका तिकिटाची किंमत २४०० रुपये इतकी आहे. दिल्लीतील काही थिएटर्समध्ये तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा लावण्यात आले आहेत. पण तरीही त्या तिकीटांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये फक्त बाहुबलीचीच धूम पाहायला मिळणार हे मात्र नक्की.

हा सिनेमा भारतात सुमारे ६५०० थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार असून जगभरात अंदाजे ९००० थिएटर्समध्ये बाहुबलीला पाहता येणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा केली जात आहे. सिनेमात प्रभास म्हणजे बाहुबली एक दोन नव्हे तर तीन भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रभास व्यतिरिक्त राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.

भारतीय सिनेसृष्टीमधील आतापर्यंतचा सर्वाधिक ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिले जात आहे. कारण आतापर्यंत बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर सिनेमे हे ५००० थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. तर दाक्षिणात्य हिट सिनेमेही जास्तीत जास्त ३००० थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. बाहुबलीसाठी घेतलेल्या थिएटर्सची संख्या पाहून किती जुने विक्रम मोडीत काढत नवे विक्रम बनवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.