भारतीय चित्रटपसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या ‘बाहुबली २ द कन्क्लुजन’ चित्रपटाने कमाईत अद्याप मोठा रेकॉर्ड केलेला नाही, असे ‘गदर’ फेम दिग्दर्शक अनिल शर्माने म्हटले आहे. अनिल यांचा मुलगा उत्कर्ष हा ‘जीनिअस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. या चित्रपटाच्या मुहूर्तावेळी ते बोलत होते.

हा फक्त त्या त्या वेळेचा प्रश्न आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’ चित्रपटाने त्यावेळी २६५ कोटी रुपये कमावले होते. आजच्या घडीला त्याचे मूल्यांकन ५००० कोटी रुपये इतके होते, असे अनिल शर्मा यांचे म्हणणे आहे. ‘गदर एक प्रेम कथा’, ‘अपने’ यासारखे अनेक हिट चित्रपट अनिल यांनी बॉलिवूडला दिले आहेत. ‘बाहुबली २’ने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांची कमाई करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. याबद्दल तुमचे मत काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, कृपया मला या गोष्टींमध्ये खेचू नका. चांगले चित्रपट आल्यावर आधीचे विक्रम मोडले जाणं स्वाभाविक आहे. ‘बाहुबली २’चं म्हणाल तर त्याने अद्याप तसा काही विक्रम प्रस्थापित केलेला नाही. चित्रपटाचे तिकीट केवळ २५ रुपये असताना ‘गदर’ने २००१ मध्ये २६५ कोटी कमवाले होते. आता त्याचं मूल्यांकन केल्यास तिच कमाई ५००० कोटी रुपये इतकी होते. ‘बाहुबली २’ने तर फक्त १५०० कोटी रुपयांची कमाई केलीये. त्यामुळे, अद्याप त्यांनी रेकॉर्ड मोडलेला नाही.’

गेल्या दोन वर्षांपासून अनिल आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष ‘जीनिअस’ चित्रपटाची तयारी करत आहेत. ‘गदर एक प्रेमा कथा’ चित्रपटात उत्कर्षने सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुलाची भूमिका साकारत बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या आगामी ‘जीनिअस’ चित्रपटासाठी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.