‘बाहुबली २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम विविध मार्गांनी या चित्रपटाची प्रसिद्धी करते आहे. अशाच एका कार्यक्रमाहून परतताना या चित्रपटाच्या टीमला एक वाईट अनुभव आला. दुबईहून भारतात परतत असताना आलेल्या या अनुभवाविषयी ‘बाहुबली’चे निर्माते शोबू यार्लागड्डा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे.

‘एमिरट्स एअरवेज’च्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला चुकीची वागणूक देत आपल्यावर वर्णभेदी टीका केल्याचे शोबू यांनी म्हटलं आहे. ‘एमिरट्स’चे कर्मचारी उगाचच आम्हाला त्रास देत होते, आमच्यासोबत उद्धटपणे वागत होते असं म्हणत दुबई विमानतळाच्या गेटजवळील एका कर्मचाऱ्याने आपल्यावर वर्णभेदी टीका केल्याचं शोबू यांनी स्पष्ट केलं. ‘मी नेहमीच ‘एमिरट्स’ने प्रवास करतो. पण, हा असा अनुभव मला पहिल्यांदाच आला आहे’, असं म्हणत शोबू यांनी खंत व्यक्त केली. शोबूच्या या ट्विटनंतर ‘एमिरट्स’तर्फे या सर्व प्रकरणाची दखल घेण्यात आली असून ट्विटरवरुन दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

शोबू यार्लागड्डा, एस.एस. राजामौली, प्रभास, राणा डग्गुबती आणि अनुष्का शेट्टी ‘बाहुबली २’च्या प्रसिद्धीसाठी दुबईला गेले होते. पण, या दुबई दौऱ्यात त्यांना इतका वाईट अनुभव येणं ही बाब दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाशी संलग्न प्रत्येक व्यक्तीचे लक्ष २८ एप्रिल या तारखेकडेच लागून राहिलं आहे असं म्हणायला हरकत नाही. २०१७ या वर्षातील ‘बिग बजेट रिलीज’ असणारा हा चित्रपट ‘बाहुबली- द बिगिनिंग’मधील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.