‘बाहुबली २’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर बॉलिवूड दिग्दर्शकांवर उपरोधिक टीका करणाऱ्या रामू अर्थात दिग्दर्शक रामगोपाल वर्माने या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यामातून त्याने ‘बाहुबलीः द कनक्ल्युजन’ हा चित्रपट ज्या लोकांना आवडलेला नाही, त्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘बाहुबली २’ चित्रपटाला नापसंती दर्शविणाऱ्या नेटिझन्सवर रामूने नाराजी व्यक्त केली. त्याने ट्विटमध्ये लिहलंय की, हा चित्रपट ज्यांना आवडलेला नाही त्यांनी मानसोपरातज्ज्ञांकडे उपचार घेण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे डॉक्टरचे बील भरण्याची निर्माता शोबूकला विनंती करेन, असा उल्लेखही त्याने या ट्विटमध्ये केला आहे. यापूर्वी त्याने बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी विश्रांती घ्यावी, असे ट्विट केले होते.

एस एस राजमौली दिग्दर्शित बाहुबली २ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर भारतासह परदेशातही चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट अनेक विक्रम प्रस्थापित करेल, अशी चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत रंगताना दिसते. जगभरात ९००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार बाहुबली हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. अनुष्का शेट्टी, प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, सत्यराज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्या भागाप्रमाणेच प्रेक्षक बाहुबलीचा दुसऱ्या भागालाही पसंती देताना दिसत आहे. सध्याच्या घडीला बाहुबलीचे वारे वाहताना दिसत असले तरी सोशल मीडियावर काही लोक या चित्रपटावर टीका देखील करत आहेत. या टीकाकारांना सुनावल्यानंतर रामूने प्रेक्षकांच्या आवडी निवडीवर भाष्य केल्यामुळे नव्या चर्चा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.