देशभरात जवळपास ६५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेला ‘बाहुबली २’ हा चित्रपट सध्या अनेक बॉक्स ऑफिस विक्रम तोडण्याच्या तयारीत आहे असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच ठिकाणच्या चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्लची पाटी असलेल्या या चित्रपटाचा दबदबा बॉक्स ऑफिसवर अगदी पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळाला. पहिल्या दिवशीच एस.एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. इतर कोणताही चित्रपट ‘बाहुबली २’च्या कमाईच्या आसपासही नाही.

२०१७ च्या सुरुवातीला अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.४२ कोटींचा गल्ला जमवला होता. त्या तुलनेत ‘बाहुबली २’ने किंग खानच्या या चित्रपटाला बरंच मागे टाकलं आहे. प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, रम्या कृष्णन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या पहिल्याच दिवसाच्या उत्साही वातावरणाचा अंदाज घेत चित्रपट, व्यापार विश्लेषक रमेश बाला, तरण आदर्श यांनी ट्विट करत ‘बाहुबली २’च्या कमाईचा आकडे सर्वांसमोर मांडले आहेत.

आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘बाहुबली २’ने सलमान खानच्या ‘सुलतान’ आणि आमिरच्या ‘दंगल’वरही मात केली आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये असणारं उत्साहाचं वातावरण आणि एकंदर सर्वत्र वाहणारे बाहुबलीचे वारे पाहता येत्या काही दिवसांमध्ये इतर कोणत्याही चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकणार नाहीच असंच दिसतंय. त्यातही महिनाअखेर आणि सलग सुट्टी आल्यामुळेही ‘बाहुबली २’ विक्रमी कमाई करत आतापर्यंतचे सर्व बॉक्स ऑफिस विक्रम मोडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी ‘बुक माय शो’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विक्रमी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झालं होतं, मात्र आता ३.३ दशलक्ष एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तिकीट विक्री हा आपल्यासाठीच विक्रम असल्याचे ‘बुक माय शो’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सक्सेना यांनी सांगितलंय.

तुर्तास, फक्त ‘बाहुबली’च्याच चर्चा होत आहेत. राजामौलींच्या या मास्टरपीस चित्रपटाच्या कथानकापासून कलाकारंच्या वेशभूषा, वीएफएक्स आणि चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतानाही काही उत्साही प्रेक्षकांनी तर, ‘बाहुबली ३’ असा चित्रपटही आला पाहिजे असं म्हणत राजामौलींसमोर एक नवा प्रस्तावच ठेवला आहे असं म्हणायला हरकत नाही.