भारतीय चित्रपट इतिहासात बहुचर्चित कोणता चित्रपट असेल तर ‘बाहुबली’ हेच नाव ऐकायला मिळेल. चित्रपटाला मिळालेले घवघवीत यश आणि बॉक्स ऑफिस रेकॉर्डमुळे हा चित्रपट नेहमीच चर्चेत राहिला. अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्स, भव्यदिव्य सेट, सर्वोत्कृष्ट अभिनय, उत्तम कथा यांमुळे फक्त तेलुगूमध्येच नाही तर देशभरात या चित्रपटाला खूप यश मिळाले. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभास आणि राणा डग्गुबती भारतीय चित्रपटसृष्टीत केवळ प्रसिद्धच नाही झाले तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणले जाऊ लागले.

फक्त चित्रपटापुरतेच मर्यादित न राहता ‘बाहुबली’चे कपडे आणि खेळणीही प्रसिद्ध झाली. आता ‘बाहुबली’ची बॉक्सिंग टीमसुद्धा येतेय. राणा डग्गुबती आणि निर्माते शोभू यार्लागड्डा यांनी मिळून ही टीम विकत घेतली आहे.

याबद्दल राणा म्हणाला की, ‘बॉक्सिंगने बालपणापासून माझ्यावर एका वेगळ्या प्रकारची जादू केली. मी हा खेळ टेलिव्हिजनवर पाहत होतो, परंतु प्रत्यक्ष अनुभवण्याची मला संधी कधी मिळाली नव्हती. त्यामुळे जेव्हा ‘बॉक्सिंग सुपर लीग’शी संलग्न होण्याची संधी माझ्यासमोर आली, त्यावेळी कसलाही विचार न करता लगेचच टीम विकत घेण्याचा निर्णय घेतला. शोभूसुद्धा माझ्यासोबत होते म्हणून ‘बाहुबली बॉक्सर्स’ असेच नाव या टीमला देण्याचा निर्णय आम्ही घेतला. जिथेही संधी मिळेल तिथे बाहुबली वेगवेगळ्या माधम्यांतून जिवंत ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’

VIDEO : तुमच्याकडे आहे का अशी ‘सुपरपॉवर’?

‘कबड्डी लीग’चाही ब्रँड अॅम्बेसेडर असलेला राणा पुढे म्हणाला की, ‘माझे वडील आणि काकांप्रमाणेच (व्यंकटेश) मीसुद्धा क्रीडाप्रेमी आहे. नवनवीन गोष्टी करायला मला खूप आवडते. किंबहुना कबड्डी हा खेळ आपण सर्वच जण कधी ना कधी आपल्या आयुष्यात खेळलो आहोत. त्यामुळे प्रो कबड्डीचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.’