‘बाहुबली २’ हा सिनेमा बघण्यासाठी आता प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे. या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरपासून ते या सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रत्येक गोष्टीने अनेकांचेच लक्ष वेधले. ‘बाहुबली २’च्या पहिल्याच ट्रेलरने सर्वाधिक व्ह्यूज मिळवण्याचा विक्रम केला. आता हा सिनेमा अजून एक विक्रम करायला सज्ज झाला आहे.

कटप्पाची भूमिका साकारणाऱ्या सत्यराजने कन्नड जनतेची माफी मागितल्यानंतर ‘बाहुबली २’ कर्नाटकातही प्रदर्शित करण्यात येईल. कर्नाटकमध्ये ‘बाहुबली २’च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. कर्नाटकप्रमाणेच तेलगू भाषिक प्रांतांमध्ये आणि केरळमध्येही अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सकाळी ६ वाजल्यापासून ‘बाहुबली २’चे शो सुरू होणार आहे. यावरूनच दाक्षिणात्य राज्यांत या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळते. चेन्नईमधील एसपीआय चित्रपटगृह सर्वात मोठं चित्रपटगृह मानलं जातं. इथे २२ एप्रिलपासून ‘बाहुबली २’ च्या प्री बुकिंगला सुरूवात करण्यात आली. या चित्रपटगृहात अवघ्या काही मिनिटांमध्येच विकेण्डची सर्व तिकीटं विकली गेली. त्यामुळे ‘बाहुबली २’ कडून सर्वाधिक कमाईच्या विक्रमाची अपेक्षा केली जात आहे. मुंबईमध्येही अशीच स्थिती पाहायला मिळेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ हा सिनेमा जगभरात सुमारे ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतात जवळपास ६५०० स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. त्यामुळे तिकीट बारीवरचा गल्ला कमवण्यातही बाहुबली २ नंबर एक बनेल यात काही शंका नाही. अभिनेता प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणारा हा सिनेमा २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.