सध्या टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत फक्त एकाच अभिनेत्याची जोरदार चर्चा आहे…तो म्हणजे प्रभास, प्रभास आणि फक्त प्रभास. एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे प्रभासच्या लोकप्रियतेने शिखर गाठला. चित्रपटाच्या यशानंतर प्रभासनेही त्याचे मानधन वाढवले. या अभिनेत्याची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. प्रभास सुमारे १८० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

हैदराबादमधील जुबली हिल्स या उच्चभ्रू वस्तीत त्याचा आलिशान बंगला आहे. २०१४ मध्ये त्याने चित्रपट नगरातही आणखी एक बंगला खरेदी केला होता. इतर दाक्षिणात्य सुपरस्टार्ससारखंच प्रभासलाही महागड्या गाड्यांची आवड आहे. तब्बल आठ कोटी रुपये किंमत असलेली रोल्स रॉयल फँटम कार त्याच्याजवळ आहे. अनेकदा त्याला या कारमध्ये फिरताना पाहिलं गेलं आहे. ‘बाहुबली’च्या यशानंतर त्याने बऱ्याच शूज ब्रँड कंपन्यांशी जाहिरातीचा करार केला होता. या प्रत्येक ब्रँडसाठी त्याने सुमारे दोन कोटी रुपये इतके मानधन घेतले होते.

वाचा : ‘बाहुबली’ फेम प्रभासला ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर

प्रभासचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ ला चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील, सुर्यनारायण राजू चित्रपट निर्माते आहेत. तर काका कृष्णम राजू प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते आहेत. त्याचे शालेय शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले आणि हैदराबादच्या श्रीचैतन्य कॉलेजमधून त्याने बी.टेक.ची पदवी घेतली. सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.