गेल्या दोन वर्षांत फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याचे नाव बॉलीवूडमध्ये खूप चर्चेत आहे. ‘मोस्ट वाँटेड’ असा लौकिक झालेल्या फवादचा अजून ‘हिरो’ म्हणून चित्रपट बॉलीवूडमध्ये प्रदर्शित झालेला नाही. पण त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला सोलो हिरो म्हणून प्रेक्षकांसमोर आणण्याचा मोह करण जोहरसारख्या निर्माता-दिग्दर्शकालाही आवरलेला नाही. उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांची इथून हकालपट्टी करण्याचा विडा उचलला आहे. एवढय़ावरच न थांबता पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका असलेले चित्रपटही प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असल्याने बॉलीवूडमधील काही मोठय़ा निर्मात्यांना याचा खचितच फटका बसणार आहे.

सोनम क पूर अभिनित ‘खुबसूरत’ चित्रपटातून बॉलीवूड प्रवेश केलेल्या फवाद खानची लोकप्रियता त्याच वेळी आलेल्या ‘िजदगी’ वाहिनीमुळे घराघरात पोहोचली. ज़िदगी’ वाहिनीवरून फवाद खानच्या प्रसिद्ध पाकिस्तानी मालिका पहिल्यांदाच भारतीय प्रेक्षकांनी पाहिल्या आणि फवादची बॉलीवूडमधली वहिवाट अगदी पक्की झाली. फवादच्या आधी पाकिस्तानी गायक, अभिनेता अली जफर अनेक वर्षे हिंदी चित्रपटांतून काम करतो आहे, मात्र त्याला फारसे यश मिळाले नव्हते. फवादला बॉलीवूडमध्ये मिळालेल्या यशामुळे मात्र सगळी समीकरणे झटपट बदलत गेली. फवादबरोबर पाकिस्तानी मालिकेत एकत्र काम केलेल्या माहिरा खानलाही शाहरूखबरोबर ‘रईस’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर आणखी काही पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलीवूडची वाट खुली होऊ लागली असली तरी त्यांची एक लाटच हिंदी चित्रपटसृष्टीत शिरते आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या तरी या लाटेला मनसेच्या निर्णयाने परतवून लावले असले तरी त्याचा मोठा धक्का बॉलीवूडला बसला आहे.

धर्मा प्रॉडक्शनचा ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ हा फवादचा दुसराच हिंदी चित्रपट होता, मात्र त्याला चांगले यश मिळाल्याने करण जोहरने आपल्या ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटातही त्याला खास भूमिका दिली आहे. करणच्या या चित्रपटात फवादच नव्हे तर इम्रान अब्बास या दुसऱ्या पाकिस्तानी अभिनेत्याची छोटी भूमिका आहे. शिवाय, करण जोहरने कतरिना कैफ आणि फवाद खान यांना घेऊन नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा फवादचा पहिला ‘सोलो हिरो’ हिंदी चित्रपट ठरणार आहे.

‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल त्याच वेळी फवाद भारतात येण्याची शक्यता असून नोव्हेंबरपासून नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याची करणची योजना आहे. मात्र सध्या तरी त्याला या निर्णयाचा फेरविचार करावा लागणार आहे. करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या नव्या पर्वाची सुरुवातही फवादपासूनच होणार होती, मात्र त्याच्याऐवजी शाहरूख आणि अलिया ही जोडी नव्या शोचा शुभारंभ करणार आहे. करणपाठोपाठ रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर ही निर्माता जोडीही अडचणीत आली आहे. माहिरामुळे ‘रईस’ इथे प्रदर्शित क रू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला आहे.

याशिवाय, पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दीकी आणि अभिनेत्री सजल अली हे दोघेही बोनी कपूर यांच्या आगामी ‘मॉम’ चित्रपटात काम करत आहेत. यात श्रीदेवीची मुख्य भूमिका आहे. अली जफर याचा भाऊ दनयाल जफर हाही यशराजच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मनसेच्या भूमिकेनंतर या चित्रपटांचे भवितव्य अडचणीत आले असले तरी अजून यावर आणखी काही तोडगा निघेल किंवा येत्या काही दिवसांत हा वाद निवळेल त्यानंतरच निर्णय घेण्याची भूमिका बॉलीवूडजनांनी घेतलेली दिसते.

फवाद खान

फवाद खानबरोबर काम करण्यास अनेक बॉलीवूड निर्माते-दिग्दर्शक उत्सुक आहेत. नितीन कक्कर दिग्दर्शित आगामी चित्रपटात फवाद सलमान खानबरोबर काम करणार असल्याचे बोलले जात होते. तूर्तास, नितीन कक्कर यांनी फवादचा चित्रपटाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे तरीही त्याच्याकडे बिग बजेट बॉलीवूडपटांच्या ऑफर्स आहेत.

 

माहिरा खान

‘ज़िदगी’ वाहिनीवरून घराघरात पोहोचलेली माहिरा बॉलीवूडची नायिका म्हणून यशस्वी होते की नाही हे ‘रईस’ प्रदर्शित झाल्यानंतरच ठरेल.

मावरा होकेन

या वर्षी ‘सनम तेरी कसम’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केलेली मावरा होकेनही फार कमी वेळात लोकांची लाडकी बनली आहे. मावरानेही दोन हिंदी चित्रपटांसाठी करार केला आहे.

इम्रान अब्बास

विक्रम भट्टच्या ‘क्रिएचर’ चित्रपटातून बिपाशा बासूचा नायक म्हणून आलेला इम्रान अब्बास ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटात दिसणार आहे.

हुमाईमा मलिक

हुमाईमा मलिक फार आधीच हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. तिने ‘राजा नटवरलाल’ चित्रपटात इम्रान हाश्मीची नायिका साकारली होती. त्यानंतर विधू विनोद चोप्रांच्या तीन चित्रपटांसाठी तिला करारबद्ध करण्यात आले आहे.

अली जफर

अली जफर याने आठ हिंदी चित्रपटांमधून काम केले आहे. गायक-अभिनेता अशा दोन्ही भूमिकांमधून अली जफर हे नाव प्रेक्षकांना परिचित आहे. सध्या तो गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात दिसणार आहे.