प्रियांका चोप्रा ‘बेवॉच’ या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमाचा आणखी एक ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात प्रियांका व्हिक्टोरिया लीड्स या खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर जॅक इफ्रान आणि ड्वेन जॉन्सन लोकांची मदत करताना या सिनेमात दिसणार आहेत. हा नवीन ट्रेलर पाहून प्रियांकाचे चाहते नक्कीच खूश झाले असतील. कारण पहिल्या ट्रेलरच्या तुलनेत या नवीन ट्रेलरमध्ये प्रियांका अधिकवेळ दिसते. या सिनेमाचा पोस्टरही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या पोस्टरमध्ये प्रियांकाची मादक अदा पाहायला मिळते आहेत. ट्रेलरमधून हे स्पष्ट होते की ‘बेवॉच’ टीमकडे उत्तम विनोद बुद्धी आहे.

या ट्रेलरमध्ये जॅक एका वेगळ्या अंदाजात दिसतोय. एका दृश्यात तो मुलींचे कपडे घालून आणि मेकअप करुन फिरताना दिसतो. त्या पेहरावाकडे बघून ड्वेनही त्याला असे का केल्याचे कारण विचारतो तेव्हा ‘हॉट’ दिसण्यासाठी मी हे सगळं करतो असे तो ठामपणे म्हणतो.
‘तो आल्यानंतर आमच्या बीचवर अमली पदार्थ, खून आणि मृतदेह सापडला आहे.’ ‘काही लोकांचा काहीच उपयोग नसतो.’ अशा वाक्यांनी ट्रेलरमध्ये प्रियांका अवतरते.

या सिनेमातल्या आपल्या व्यक्तिरेखेबद्दल एका शोमध्ये बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘मला या सिनेमात खलनायिकेची भूमिका साकारताना फार मजा आली. मला नाही माहिती किती महिलांना ‘द रॉक’ला धमकवण्याची संधी मिळाली असेल. माझी व्यक्तिरेखा ही सिनेमातील इतर पात्रांसाठी फारच वाईट असते. मला इतरांबद्दल माहिती नाही पण जेव्हा तुम्ही इतरांसाठी वाईट बनता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचाही आनंद घेतला पाहिजे. कोणाला कमी लेखत असाल तर त्याचाही आनंद घेता आला पाहिजे. एखाद्याचा पाणउतार करण्यातही एक वेगळी मजा आहे.’ तिच्या या वक्तव्यावर शोच्या सूत्रसंचालकाने आश्चर्य व्यक्त करत ‘खरं? मला हे माहिती नव्हतं,’ अशी प्रतिक्रिया दिली.

या शोनंतर प्रियांकाने तिच्या न्यूयॉर्कच्या घरी मित्र-परिवारासोबत होळी खेळली होती. होळीचे फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, माझ्या घरी आलेले हे ‘पांढरे’ आज रंगीबेरंगी झाले. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने मॅरी क्लेअर मासिकासाठी केलेल्या खास फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. २६ मे २०१७ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.