बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अक्षय कुमार. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणून अक्षय आज प्रसिद्ध आहे. मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट असलेला या अभिनेत्याचा जन्म अमृतसर येथे ओम आणि अरुणा भाटिया या दाम्पत्याच्या पोटी ९ सप्टेंबर १९६७ रोजी झाला. यावर्षी अक्षय वयाची पन्नाशी पूर्ण करेल. लवकरच तो ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानावर हा चित्रपट आधारित आहे. गेल्या काही वर्षांपासून अक्षय सामाजिक विषयांवर बेतलेले आणि देशभक्तीपर आधारित ब्लॉकबस्टर चित्रपट करताना दिसतोय.

अक्षयचे खरे नाव राजीव हरी ओम भाटिया असे आहे. त्याचे बालपण दिल्लीतील चांदनी चौकमध्ये गेले. त्यानंतर तो मुंबईत आला आणि कोळीवाडा परिसरात राहू लागला. डॉन बॉस्कोमध्ये त्याने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने पुढच्या शिक्षणासाठी गुरु नानक खालसा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

वाचा : ‘या’ जोडीने जिंकलं ‘नच बलिये’चं आठवं पर्व

महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यातच सोडून नंतर तो थायलंडला गेला आणि तिथे मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण घेत असताना तो आणखी एक काम तेथे करत होता. ते काम कोणते होते याचेच उत्तर तुम्हाला द्यायचे आहे.

प्रश्न- बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय कुमार कोणते काम करत होता?
पर्याय-
१. टीचर
२. वेटर
३. मॉडेल
अक्षय कुमारचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास फार रंजक आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. आगामी काळात जर अक्षयवर बायोपिक आला तर त्याबद्दल नवल वाटायला नको. लवकरच अक्षय ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’, ‘रोबोट २.०’, ‘पॅडमॅन’ आणि ‘गोल्ड’ यांसारख्या विविध विषयांवरील चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

गेल्या आठवड्यातील प्रश्नाचे उत्तर
प्रश्न- ‘धरमवीर’ चित्रपटातील ‘या’ बालकलाकाराला ओळखलं का?
उत्तर- बॉबी देओल