अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या निखळ सौंदर्यांने आणि स्मितहास्याने अनेकांच्याच मनाचा ठाव घेत असते. बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांच्या मनावर छाप सोडणारी दीपिका सध्या तिच्या हॉलिवूड पदार्पणामध्ये व्यग्र आहे. ‘xXx: रिर्टन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटतून दीपिका हॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण सौंदर्याच्या बळावर अनेकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाआधीच एका नव्या लूकने अनेकांनाच आश्चर्यचकित केले आहे. दीपिका एका मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या दीपिकाच्या फोटोवरच सध्या अनेकांच्या नजरा खळलेलं पाहायला मिळत आहे.

वाचा: दीपिका-विनची ‘कॉफी डेट’ होणार का यशस्वी?

कोणा एका मासिकाच्या मुखपृष्ठावर ‘कव्हर गर्ल’ म्हणून झळकण्याची दीपिकाची ही पहिलीच वेळ नाही. पण, ‘हॅलो’ या मासिकाच्या डिसेंबर महिन्याच्या आवृत्तीवर झळकणारे दीपिकाचे हे रुप पाहिल्यावर अनेकांचेच असे म्हणणे आहे की, एखाद्या मासिकाच्या ‘कव्हर गर्ल’च्या भूमिकेमध्ये दीपिकाला कोणीही मागे टाकू शकत नाही. या मासिकाच्या ट्विटर अकाऊंटवरुन दीपिकाचा फोटो असणारे मुखपृष्ठाचे एक छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. तिचा हा फोटो इन्स्टाग्राम आणि ट्विटर तसेच इतर सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सवर गाजत आहे. ‘xXx: रिर्टन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून दीपिका सेरेना उनगेरच्या भूमिकेत झळकणार आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विन डिझेल आणि दीपिकाची जोडी सध्या प्रेक्षकांची दाद मिळवत आहे.

दरम्यान, सध्या दीपिका संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये दीपिकाच्या सौंदर्याचा राजेशाही थाट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण मोठ्या उत्साहात सुरु असून सर्वच कलाकार चित्रपटासाठी मेहनत घेत आहेत.