अभिनेत्री विद्या बालनची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘बेगम जान’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर एक वेगळा काळ उभा करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित ‘राजकहीनी’ या बंगाली सिनेमाचा हिंदी व्हर्जन म्हणजे ‘बेगम जान’. विद्या बालनच्या लूकपासून ते तिच्या दर्जेदार अभिनयापर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. याच ट्रेलरमधे असे काही क्षण होते, ज्याच्यावरुन तुमची नजर आणि कान हटता हटणार नाही. याच ५ क्षणांवर टाकलेली एक नजर..

देहव्यापार करणाऱ्या एका कुंटणखान्यातून जेव्हा भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमा जातात आणि कुंटणखाना बंद करण्याचे फर्मान काढले जाते तेव्हा जीवापाड जपलेला तो कुंटणखाना वाचवण्यासाठी ‘बेगम जान’ सरकारी अधिकाऱ्यांशी आणि कुंटणखान्याच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येकाशी कसे दोन हात करते याची झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.

अमिताभ बच्चन यांचा आवाजः बिग बी आणि भारदस्त आवाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू. याच आवाजामुळे आकाशवाणीमध्ये नोकरी डावलण्यात आलेल्या अमिताभ यांचा हाच आवाज एक ओळख बनली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच अमिताभ यांचा आवाज ऐकू येतो. त्यांचा आवाज ऐकूनच अनेकांचे लक्ष त्या ट्रेलरकडे जाते. जेव्हा ते बोलू लागतात तेव्हा छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा भव्य वाटू लागते. हा ट्रेलर पाहतानाही हाच अनुभव येतो. ट्रेलरची उत्सुकता त्यांचा आवाज ऐकून अधिक वाढते.

दमदार संवादः ‘बेगम जान’च्या तोंडातले ते संवाद खरेतर तिच्या अधिकच प्रेमात पाडणारे आहेत. ‘राणी की तरह मरुंगी अपने मेहल में..’ हा डायलॉग जेव्हा ती बोलते, तिच्यातली ती ऊर्जा आपसूक आपल्यात भिनत जाते आणि आपल्यालाही त्या काळात घेऊन जाते. ऐतिहासिक सिनेमा असल्यामुळे यातले संवादही तेवढेच दमदार असणे आवश्यक होते. ‘बेगम जान’शिवाय म्हणजे विद्या शिवाय असे दमदार संवाद अजून कोण बोलू शकतं?

बिनधास्त भाषाः संवांदांबद्दल बोलत असताना या सिनेमात वापरलेल्या भाषेकडे दुर्लक्ष करुन कसं चालेल. कोणत्याही हिंदी सिनेमात एखाद्या अभिनेत्रीला शिवराळ भाषेत बोलण्याची अनुमती मिळणे हा योग तसा दुर्मिळच. या ट्रेलरमधली भाषा ही खूप ‘बोल्ड’ अशीच म्हणावी लागेल. व्यक्तिरेखेला साजेशी अशीच भाषा विद्याच्या तोंडी देण्यात आली आहे, त्यामुळे ट्रेलर पाहताना ही रांगडी भाषा जरी कानावर पडत असली तरी ती कुठेही अश्लील वाटत नाही.

विद्याचा लूकः विद्याला नेहमीच आपल्या लूकसोबत वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. हा लूक पाहून याची जाणीव प्रकर्षाने होत राहते. हा लूक तिने चांगल्या पद्धतीने पेलला आहे. हा ट्रेलर पाहताना कुठेही आपण विद्या बालनला पाहतो असे एकदाही वाटत नाही. बेगम जानच्या भूमिकेत ती एवढी चपखल बसते की आता तिच्या व्यतिरिक्त ही भूमिका कोणी करु शकले असते का, याचा विचार केला तरी कोणत्याही अभिनेत्रीचे नाव समोर येत नाही हे विद्याचे यश आहे. विस्कटलेले केस, नाक टोचलेले, जाड भुवया आणि फिकट रंगाचे डोळे असलेल्या बेगम जानची ती ओळखच आहे.

चंकी पांडेः तुम्हाला जर वाटत असेल की ५ सर्वोत्तम क्षणांमध्ये चंकी पांडे कुठून आला? यात काही विनोदही आहेत का? पण तसे नाही. हा हाऊसफुल अभिनेता या सिनेमात पूर्णतः वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नकारात्मक छटा असलेल्या व्यक्तिरेखेत चंकी फारच उठून दिसत आहे. थंड डोक्याने विचारपूर्वक काम करणाऱ्या चंकीची ही व्यक्तिरेखा त्याच्या चाहत्यांना आनंदच देऊन जाणारी असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

१४ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात विद्या बालनसोबतच इला अरुण, गौहर खान, आशिष विद्यार्थी, रजित कपूर आणि नसिरुद्दीन शहा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.