सेन्सॉर बोर्डाच्या कोलकाता येथील विभागीय कार्यालयाने नोटाबंदीवर तयार करण्यात आलेल्या बंगाली चित्रपटाला प्रमाणपत्र देणे टाळले आहे. बोर्डाने हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्याकडे पाठविला आहे. तेच याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित करण्यात येणार होता.  यासंदर्भात बंगालचे विभागीय अधिकारी अजॉय म्हणाले, सुवेंदु घोष दिग्दर्शित ‘शून्यता’ या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमलेल्या समितीमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे हा चित्रपट निहलानी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

कोलकाता येथील सेन्सॉर बोर्डाच्या या भूमिकेवर चित्रपटाचे दिग्दर्शक घोष यांनी बोचरी टीका केली . मोदी सरकारला दुखावू नये, या भावनेमुळेच कोलकाता बोर्डाने चित्रपटाच्या प्रमाणपत्राविषयी भूमिका घेणे टाळले असल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीविरोधात असल्यामुळेच बंगाल सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असे ते म्हणाले. घोष यांनी १६ मार्चला हा चित्रपट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विभागीय बोर्डाकडे पाठवला होता. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजित असताना बंगाल बोर्डाच्या भूमिकेमुळे चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यात दिरंगाई होत आहे. या चित्रपटामध्ये नोटाबंदीच्या निर्णयानंतर सामान्य जनतेला झालेला त्रास दाखविण्यात आला आहे.

घोष यांचा ‘शून्यता’ चित्रपट तीन भागांचा आहे. यापूर्वी डॉक्यूमेंट्रीच्यास्वरुपात ‘शून्यता’ आणि ‘शून्यता २’ या दोन भागांना सेन्सॉरने अनुक्रमे यू/ए आणि यू असे प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, १०५ मिनिटांच्या तिसऱ्या भागाला प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत आहेत.