जमैका येथे आयोजित ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत पहिल्या १० क्रमांकांमध्ये स्थान मिळविणाऱ्या नाशिकच्या भैरवी बुरड (२०) हिने याच स्पर्धेतंर्गत ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ होण्याचा मान मिळविला आहे.

भैरवी ही बी.वाय.के. महाविद्यालयात तृतीय वर्षांत आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेल्या भैरवीने ऑगस्टमध्ये दिल्ली येथे झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल इंडिया २०१७’ या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे तिला ‘ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

अलीकडेच जमैकामध्ये झालेल्या ‘मिस ग्लोबल इंटरनॅशनल’ स्पर्धेत भैरवीने पहिल्या १० जणींमध्ये येण्याचा मान मिळविला. तसेच याच स्पर्धेत ती  ‘मिस ग्लोबल एशिया २०१७’ची मानकरी ठरली. भैरवीला नृत्याचीही आवड असून तिने आतापर्यंत नृत्याच्या विविध स्थानिक स्पर्धामध्ये बक्षिसे मिळविली आहेत.

आई-वडिलांचे प्रोत्साहन, आप्तांच्या शुभेच्छा व आत्मविश्वास यामुळे या स्पर्धेत यश मिळवू शकल्याची भावना भैरवीने व्यक्त केली आहे. भविष्यात ‘मिस इंडिया’चा किताब पटकावत ‘मिस वर्ल्ड’ किंवा ‘मिस युनिव्हर्स’ होण्याचा मनोदयही तिने व्यक्त केला आहे.