युट्यूब आणि वेबसीरिज जगतामध्ये सध्या बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आणि धमाल संकल्पना मांडल्या जात आहेत. टेलिव्हिजनप्रमाणेच युट्यूबचाही वेगळा असा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. सध्या युट्यूब जगतात ‘भारतीय डिजिटल पार्टी’ (भाडिप) या चॅनलची चलती पाहायला मिळते आहे. नुकताच या चॅनलवर ‘जनरल अॅलर्ट’ हे रॅप साँग प्रदर्शित करण्यात आले आहे.

पुण्यातील सद्यस्थिती, लोकांची गर्दी आणि होणारी कोंडी या साऱ्याचे चित्रण ‘जनरल अॅलर्ट’मध्ये करण्यात आलं आहे. पुण्यासारख्या महानगरात राहणाऱ्या आधुनिक, गोंधळलेल्या, रागावलेल्या मनांबद्दलचा हा मराठी रॅप व्हिडिओ सारंग साठ्येने दिग्दर्शित केला आहे. तर, निदकने हा रॅप लिहिला असून, त्यानेच संगीतबद्ध केला आहे. भाडिपच्या ‘जनरल अॅलर्ट’ची संकल्पना आणि ती मांडण्याची पद्धत सध्या अनेकांची दाद मिळवते आहे.

गाण्याच्या विविध प्रकारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘रॅप साँग्स’ चर्चेत आहेत. शब्द, प्रसंग किंवा मग एखाद्या घटनेविषयीची शाब्दिक गुंफण करत त्याला एका ठराविक चालीची साथ देत रॅप साँग सादर केलं जातं. मुख्य म्हणजे पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेपुरताच रॅप साँग्सचं हे प्रस्थ मर्यादित असल्याचं दिसत होतं. पण, आता मात्र मराठीतही रॅप साँग तग धरते आहे असंच म्हणावं लागेल.